इंडिया अ संघाची स्थिती मजबूत
वृत्तसंस्था / अनंतपूर
2024 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीतील सामन्यात रियान पराग आणि रावत यांच्या शानदार अर्धशतकांमुळे इंडिया अ संघाने इंडिया क संघाविरुद्ध आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे.
या सामन्यात इंडिया अ ने पहिल्या डावात 297 धावा जमविल्यानंतर इंडिया क चा पहिला डाव 234 धावांत आटोपला. इंडिया अ ने पहिल्या डावात 63 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर इंडिया अ संघाने दुसऱ्या डावात दिवसअखेर 64 षटकात 6 बाद 270 धावा जमवित इंडिया क संघावर 333 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
इंडिया क संघाने 7 बाद 216 या धावसंख्येवरुन शनिवारी खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे तीन गडी 18 धावांची भर घालत तंबूत परतले. इंडिया क चा पहिला डाव 71 षटकात 234 धावांवर समाप्त झाला. इंडिया क च्या डावामध्ये अभिषेक पोरलने 82 तर नारंगने 41 धावा केल्या. इंडिया अ तर्फे अकिब खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
63 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंडिया अ संघाने दुसऱ्या डावाला दमदार सुरूवात केली. रियान परागने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 101 चेंडूत 73 धावा झळकविल्या तर शाश्वत रावतने 67 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 53 धावा झळकविल्या. कर्णधार मयांक अगरवालने 34 धावांचे योगदान दिले. पराग आणि रावत यांनी पाचव्या गड्यासाठी 105 धावांची भागिदारी केली. दिवसअखेर यष्टीरक्षक कुशाग्रह 54 चेंडूत 40 धावांवर तर कोटियान 13 धावांवर खेळत आहेत. इंडिया क तर्फे कंबोज, गौरव यादव आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी आहे.
संक्षिप्त धावफलक: इंडिया अ प. डाव 297, इंडिया क प. डाव 71 षटकात सर्वबाद 234 (पोरल 82, नारंग 41, अकिब खान व आवेश खान प्रत्येकी 3 बळी), इंडिया अ दु. डाव 64 षटकात 6 बाद 270 (रियान पराग 73, रावत 53, अगरवाल 34, कंबोज, गौरव यादव व मानव सुतार प्रत्येकी 2 बळी)