भारत ‘अ’ संघाचा आजपासून ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध सामना
अभिमन्यू ईश्वरन, नितीशकुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णावर राहील नजर
वृत्तसंस्था/ मॅके, ऑस्ट्रेलिया
अभिमन्यू ईश्वरन, नितीशकुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा हे आज गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या भारत ‘अ’ संघाच्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामन्याचे केंद्रबिंदू असतील. 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेसाठी ईश्वरन, नितीश आणि प्रसिद्ध यांचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे आणि ऑस्ट्रेलियन परिस्थितीत त्यांची कामगिरी कशी होते हे जाणून घेण्यास ‘थिंक टँक’ उत्सुक असेल.
ईश्वरनच्या कामगिरीला अधिक महत्त्व असेल. कारण जर कर्णधार रोहित शर्माने वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एखाद-दुसरा सामना चुकविला, तर त्याची जागा तो घेण्याची शक्यता आहे. ईश्वरन हा भारत ‘अ’ संघाचा उपकर्णधार असून तो अनुभवी खेळाडू आहे. त्याने 99 प्रथम श्रेणी सामने खेळून 27 शतके आणि 29 अर्धशतकांसह 7638 धावा केल्या आहेत. यापूर्वीही तो भारतीय संघाचा भाग राहिला होता. पण प्रथम श्रेणी सामन्यांमधील त्याचा अलीकडचा फॉर्म आत्मविश्वास वाढविणारा आहे. जरी भारतात या हंगामात त्याने आतापर्यंत अनुभवलेल्या परिस्थितीपेक्षा येथील परिस्थिती खूपच वेगळी असली, तरी ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
दुसरीकडे, नितीशला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे आणि त्यातही फलंदाजी हे त्याचे शक्तिस्थान आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये नितीशच्या पाच सामन्यांत सर्वाधिक धावा या 40 राहून दोनदा तो शून्यावर बाद झाला तसेच त्याला केवळ दोन बळी मिळाले. पण निवड समितीने शार्दुल ठाकूरसारख्या वरिष्ठ नावाऐवजी त्याला पाठिंबा दिला आहे. आंध्रचा हा खेळाडू कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, कूपर कॉनॉली आणि स्कॉट बोलँड यासारख्या सक्षम खेळाडूंचा समावेश असलेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध कशी कामगिरी करतो हे तपासण्याच्या दृष्टीने ही एक चांगली संधी आहे.
प्रसिद्धचा भारत ‘अ’ संघात उशिरा समावेश झालेला आहे आणि कर्नाटकच्या या वेगवान गोलंदाजाने येथे लय मिळविण्याची गरज आहे. दुखापतीतून परतल्यानंतर प्रसिद्धने दुलीप ट्रॉफी, इराणी चषक आणि रणजी ट्रॉफीमधील सामन्यांत फक्त सात बळी घेतलेले आहेत. परंतु ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर त्याच्या उंचीचा फायदा होईल असा विचार करून त्याला निवडण्यात आल्याचे दिसते.
याव्यतिरिक्त कर्णधार ऋतुराज गायकवाड, आघाडीचा फलंदाज बी. साई सुदर्शन, वेगवान गोलंदाज यश दयाल आणि नवदीप सैनी आणि मधल्या फळीतील फलंदाज देवदत्त पडिक्कल हे ठसा उमटविण्यास उत्सुक असतील. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सुद्धा या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास उत्सुक असेल.
सामन्याची वेळ : पहाटे 5.30 वा.