बुमराहने गमावला ‘नंबर वन’चा मुकुट
कसोटी रँकिंगमध्ये आफ्रिकेचा रबाडा अव्वलस्थानी : विराट-रोहितचीही घसरण
वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे. त्याने तीन स्थानांची झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे. बुमराहची तिसऱ्या स्थानी घसरण झाली असून ऑस्ट्रेलियाचा जोस हॅजलवूड दुसऱ्या स्थानी आला आहे. याशिवाय, फलंदाजी क्रमवारीत विराट व रोहितला मोठा फटका बसला असून दोघेही 14 व 24 व्या स्थानी आहेत.
कागिसो रबाडाने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी करत 9 विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याच्या खात्यात 860 गुण आहेत. बुमराह (846) तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. पुण्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (847) दुसऱ्या स्थानावर असून आर अश्विन (831) चौथ्या आणि कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्स (820) पाचव्या स्थानावर आहे. अन्य भारतीय गोलंदाजांमध्ये रविंद्र जडेजा आठव्या स्थानी असून कुलदीप यादव 17 व्या स्थानावर आहे. या दोघांनाही दोन स्थानाचा फटका बसला आहे.
रावळपिंडीत इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत स्फोटक कामगिरी करत पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमान अलीने टॉप 10 मध्ये प्रवेश केला. या सामन्यात नोमानने नऊ विकेट घेतल्या. त्याने आठ स्थानांनी झेप घेतली असून तो नवव्या स्थानावर पोहचला आहे. त्याच्याच देशाचा फिरकी गोलंदाज साजिद खान या सामन्यात 10 विकेट घेत 12 स्थानांनी पुढे सरकत 38व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताविरुद्धच्या पुणे कसोटीत 13 बळी घेणारा न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने कसोटी गोलंदाजांच्या यादीत 30 स्थानांनी झेप घेत 44 व्या स्थानावर मजल मारली आहे. त्याचे 458 रेटिंग गुण आहेत.
विराट-रोहितला फटका, जैस्वाल टॉप 3 मध्ये
फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांचे मोठं नुकसान झाले आहे. कोहली 7 स्थानांनी घसरून 14 व्या स्थानावर फेकला गेला आहे. दुसऱ्या कसोटीत तो फ्लॉप ठरला होता. रोहितला 9 स्थानांचे नुकसान झाले असून तो आता 24 व्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचे 649 गुण आहेत. ‘हिटमॅन‘नं पुणे कसोटीत फक्त 8 धावा केल्या होत्या. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (708) खराब कामगिरीमुळे पाच स्थानांनी घसरून 11 व्या स्थानावर पोहचला आहे. टॉप 10 फलंदाजांमध्ये फक्त एक भारतीय आहे. युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला एका स्थानाचा फायदा झाला असून ताज्या क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट (903) अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुखापतीमुळे भारताविरुद्धची कसोटी मालिका खेळत नसला तरी तो दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
सांघिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया नंबर 1!
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ सांघिक क्रमवारीत 124 गुणासह पहिल्या स्थानी आहे. भारतीय संघ 121 गुणासह दुसऱ्या स्थानी असून दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या तर श्रीलंकन संघ पाचव्या स्थानी आहे.