इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा
अभिमन्यू ईश्वरनकडे कर्णधारपदाची धुरा : शार्दुल ठाकुर, करुण नायरला संधी
वृत्तसंस्था/ मुंबई
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या हाती संघाची धुरा देण्यात आली आहे. याचवेळी, शार्दुल ठाकूर, करुण नायरलाही संघात स्थान देण्यात आले आहे. इशान किशनचेही पुनरागमन झाले असून नितीश कुमार रे•ाr, मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनाही संघात स्थान मिळाले आहे. आगामी इंग्लंड दौरा भारतीय संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली या दिग्गजांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूसाठी ही मोठी संधी असणार आहे.
भारत अ संघाला इंग्लंडमध्ये तीन सामने खेळायचे आहेत. यापैकी दोन सामने इंग्लंड लायन्सविरुद्ध असतील, तर तिसरा सामना भारतीय क्रिकेट संघासोबत खेळला जाईल. भारत अ संघाचा इंग्लंड लायन्स विरुद्धचा पहिला सामना 30 मे ते 2 जून दरम्यान आणि दुसरा सामना 6 जून ते 9 जून दरम्यान खेळला जाईल. यानंतर भारतीय वरिष्ठ संघाबरोबरचा सामना 13 ते 16 जून दरम्यान खेळला जाईल. वरिष्ठ संघाला 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जाईल. हा दौरा 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहील.
करुण नायर, शार्दुलचे पुनरागमन
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल करुण नायरला लॉटरी लागली आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी करुणसह शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या करुण व शार्दुल यांनी शानदार कामगिरी केली आहे. याशिवाय, केंद्रीय करार मिळाल्यानंतर, इशान किशनची संघात निवड झाली आहे. पण श्रेयस अय्यरला मात्र संघात स्थान मिळालेले नाही. ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खान यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. गोलंदाजीत मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, खलील अहमद आणि तुषार देशपांडे यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
अभिमन्यू ईश्वरनकडे नेतृत्वाची धुरा
इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आलेले नाही. याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल सारखी अनेक मोठी नावे या यादीत समाविष्ट आहेत. परंतु निवडकर्त्यांनी तरुण खेळाडू अभिमन्यू ईश्वरनवर विश्वास दाखवला आहे आणि त्याला भारताच्या ‘अ‘ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांची संघात निवड झाली आहे. पण ते पहिला सामना खेळू शकणार नाहीत. आयपीएलचा अंतिम सामना लक्षात घेऊन हे करण्यात आले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ - अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, नीतीश कुमार रे•ाr, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कम्बोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुभमन गिल और साई सुदर्शन (दोघेही दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होतील)