अनिर्णीत कसोटीत इंडिया अ चे वर्चस्व
केएल राहुल, ईश्वरन,कोटियन, कंबोज यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / नॉर्दम्पटन
इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात येथे झालेली दुसरी आणि शेवटची अनधिकृत कसोटी अनिर्णीत राहिली. सोमवारी खेळाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी चहापानावेळी इंडिया अ संघाने दुसऱ्या डावात 7 बाद 417 धावा जमवित डाव घोषित केला. यावेळी इंग्लंड लायन्स संघावर 438 धावांची भक्कम आघाडी मिळविली होती. इंडिया अ संघातील चार फलंदाजांनी अर्धशतके झळकविली. त्यानंतर इंग्लंड लायन्सने दुसऱ्या डावात 11 षटकात 3 बाद 32 धावा जमविल्या.
या सामन्यात इंडिया अ संघाने पहिल्या डावात 348 धावा जमविल्यानंतर इंग्लंड लायन्स संघाचा पहिला डाव 327 धावांवर समाप्त झाला. इंडिया अ संघाने 21 धावांची आघाडी पहिल्या डावात घेतली. त्यानंतर इंडिया अ संघाने 4 बाद 163 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला पुढे सुरूवात केली आणि चहापानापर्यंत त्यांनी 92 षटकात 7 बाद 417 धावा जमविल्या होत्या.
इंडिया अ च्या दुसऱ्या डावात के. एल. राहुलने 64 चेंडूत 9 चौकारांसह 51, कर्णधार ईश्वरनने 92 चेंडूत 10 चौकारांसह 80, करुण नायरने 3 चौकारांसह 15, ध्रुव जुरेलने 3 चौकारांसह 28, नितीशकुमार रे•ाrने 78 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 42, शार्दुल ठाकुरने 2 षटकार आणि 3 चौकारांसह 34 धावा जमविल्या. तनुष कोटीयन आणि कंबोज या जोडीने आठव्या गड्यासाठी अभेद्य 149 धावांची शतकी भागिदारी केली. चहापानावेळी कोटीयन 1 षटकार 10 चौकारांसह 90 तर कंबोज 1 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावांवर खेळत होते. इंग्लंड लायन्सतर्फे हिलने 3 तर वोक्स आणि जॅक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ईश्वरन आणि राहुल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. इंडिया अ ने चहापानानंतर आपला दुसरा डाव घोषित केला.
त्यानंतर इंग्लंड लायन्सने दुसऱ्या डावात 11 षटकात 3 बाद 32 धावा केल्या असताना दोन्ही संघांच्या कर्णधारांनी खेळ थांबवित कसोटी अनिर्णीत राहिल्याचे घोषित केले. इंग्लंड लायन्सच्या दुसऱ्या डावात हेन्सने 7, मिकेनीने 16 तर गे ने 5 धावा केल्या. कंबोजने 2 तर देशपांडेने 1 गडी बाद केला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सरावाच्या दृष्टिकोनातून दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका आयोजित केली होती आणि या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहला होता.
संक्षिप्त धावफलक: इंडिया अ प. डाव 89.3 षटकात सर्वबाद 348, इंग्लंड लायन्स प. डाव 89 षटकात सर्वबाद 327, इंडिया अ दु. डाव 92 षटकात 7 बाद 417 (राहुल 51, ईश्वरन 80, नायर 15, जुरेल 28, नितीशकुमार रे•ाr 42, ठाकुर 34, कोटीयन खेळत आहे 90, कंबोज खेळत आहे 51, अवांतर 21, वोक्स व जॅक प्रत्येकी 2 बळी, हिल 3-64), इंग्लंड लायन्स दु. डाव 11 षटकात 3 बाद 32 (हेन्स 7, मिकेनी 16, गे 5, कंबोज 2 तर देशपांडे 1 बळी)