भारत ‘अ’-ऑस्ट्रेलिया ‘अ’ दुसरा सामना आजपासून
वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारत ‘अ’ संघाचा ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धचा दुसरा सामना आज गुरुवारपासून येथे सुरू होणार असून यावेळी के. एल. राहुलची फलंदाजी आणि त्याच्या फॉर्मवर राष्ट्रीय निवड समिती लक्ष ठेवेल. राहुल भारत ‘अ’ संघातर्फे आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाला असून ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघात स्कॉट बोलंडसारख्या अनुभवी खेळाडूचा समावेश आहे.
राहुल वगळता भारत ‘अ’ संघात असा एकही खेळाडू नाही जो प्रतिष्ठित एमासीजी मैदानावरील सामन्यात सहभागी झालेला आहे. भारत या ठिकाणी 28 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या मध्यास वगळण्यात आल्यानंतर भारतीय निवड समितीने संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत करून राहुल आणि राखीव यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांना ’अ’ संघाच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला पाठविण्याचा निर्णय घेतला.
11 जानेवारी रोजी पर्थ येथे राहुल व जुरेल वरिष्ठ संघात सामील होतील. ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ राखीव वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला बोलंड फॉर्मात असताना अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, बी. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांच्यासाठी ही एक कठोर परीक्षा असेल. परंतु राहुलवर नक्कीच जास्तीत जास्त लक्ष असेल. याचे कारण प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. एमसीजीवरील सराव सत्रादरम्यान राहुल चांगला सुरात दिसला.
ईश्वरन आणि कर्णधार गायकवाड सलामीला येणार असल्याने भारत ‘अ’ संघरचनेत राहुल पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, अशी अपेक्षा आहे. कारण कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघात निवड झाल्यास याच क्रमांकांवर त्याला फलंदाजीस यावे लागेल. चेंडू उसळणाऱ्या परिस्थितीत दर्जेदार वेगवान गोलंदाजीस तोंड देण्याच्या दृष्टीने लॉर्ड्स, ओव्हल, सिडनी, सेंच्युरियन येथील शतकांसह राहुल हा सर्फराज खानपेक्षा अधिक सुसज्ज दिसतो. असे असले, तरी बेंगळूर येथे न्यूझीलंडविऊद्ध 150 धावा केल्यानंतर सर्फराज खानचे पारडे 22 नोव्हेंबरपासून ऑप्टस स्टेडियमवर खेळण्याच्या बाबतीत नक्कीच जड झालेले आहे.
भारत ‘अ’च्या मॅके येथे पहिली लढत खेळलेल्या संघात चार बदल पाहायला मिळतील. सदर लढतीत पाहुण्यांना सात गडी राखून पराभूत केले होते. राहुल बाबा इंद्रजितच्या जागी येईल, ज्याने त्या लढतीत 9 आणि 6 धावा केल्या. वेग आणि बाऊन्सच्या समोर तो अजिबात आरामदायक दिसला नाही. जुरेल हा इशान किशनच्या जागी येईल. इशान किशन मॅके येथे ‘बॉल-चेंज’ वादाच्या केंद्रस्थानी राहिला होता आणि त्याच्या क्षुल्लक टिप्पणीमुळे मैदानावरील पंच नाराज झाले होते. याशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद नवदीप सैनीची, तर ऑफस्पिनर असलेला अष्टपैलू तनुष कोटियन हा डावखुरा फिरकीपटू मानव सुतारची जागा घेतील. यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल आणि मधल्या फळीतील फलंदाज रिकी भुई यांना मात्र खेळण्याची संधी मिळणार नाही.