कारवार जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कारवार : विविध कार्यक्रमांसह संपूर्ण कारवार जिल्ह्यात 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन येथील जिल्हा पोलीस मैदानावर करण्यात आले होते. जिल्हा पालकमंत्री व मासेमारी व बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, शिक्षणाचे महत्त्व आणि उपयोग ओळखून जिल्ह्यात शिक्षणाला पहिले प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना स्वत:ची इमारत उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पूरक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्ह्यातील कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असे स्पष्ट करुन मंत्री वैद्य म्हणाले,
लाखो स्वातंत्र्य योद्ध्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे आपले आद्य कर्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आम्ही देशवासीय समानता आणि ऐक्य व एक होऊन जीवन जगत आहोत. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंकोला तालुक्यातील शिरुर येथे दरड कोसळण्याची आणि कोडीबाग-कारवार येथे काळीनदीवरील पूल कोसळण्याच्या अतिशय दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटनांतून आम्ही काही धडे शिकले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. वैद्य म्हणाले, शिरुर येथील दुर्घटनेत अकरा जणांचा जीव गेला आहे. यापैकी आठ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
तीन जणांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. शिरुर येथील दुर्घटनेतील मृतांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार त्या पाच गॅरंटी योजना भविष्यातही राबविण्यासाठी कटिबद्ध आहे. त्या पाच गॅरंटी योजनांमुळे राज्यवासीय सुखी आणि समाधानी जीवन जगत आहेत. जिल्ह्यातील कांही बंदराचा दर्जा उंचावून ही बंदरे मासेमारी व्यवसायाला हातभार लावतील, यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुणी जणांचा मंत्री वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एकूण 16 पथकांनी शानदार पथसंचलन केले. यावेळी कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के., कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एन. नारायण, कारवार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यदर्शी ईश्वर कांदू आदी उपस्थित होते.