जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात
जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गॅरंटी योजना यशस्वीपणे राबवताहेत : पालकमंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक संघर्षातून भारतीयांना मिळालेल्या स्वातंत्र्याने जगाच्या राजकीय इतिहासातील एक नवा अध्यायउघडला आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरु, लालबहाद्दूर शास्त्री, बाळ गंगाधर टिळक आणि इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे. स्वातंत्र्य लढ्यात देशभक्त आणि स्वाभिमानी सैनिकांचे योगदान देण्यात बेळगाव जिल्हा अग्रेसर होता, असे विचार पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहेत.
गुरुवारी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडांगणावर 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्य लढ्यात कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांचेही कार्य मोठे आहे. त्याचबरोबर कर्नाटकाचा सिंह म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाधरराव देशपांडे यांचे योगदानही मोठे आहे. यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या अनेक व्यक्तींचे स्मरण होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव येथे 1924 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अधिवेशन झाले. यानिमित्ताने शताब्दी साजरी करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अनेक लोकाभिमुख योजना राबवत आहे. त्याबरोबर सामाजिक न्याय आणि समतेच्या मार्गावर ठोस पावले उचलली जात आहेत. जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गॅरंटी योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत.
शक्ती योजना
शक्ती योजनेपूर्वी जिल्ह्यात दररोज सरासरी 5.40 लाख प्रवासी प्रवास करीत होते. शक्ती योजनेनंतर आता दररोज सरासरी 7.65 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे दररोज 2.25 लाख प्रवाशांची वाढ झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून 32.4 कोटी प्रवाशांपैकी 20.13 कोटी महिला प्रवासी आहेत.
अन्नभाग्य
सरकारच्या पाच हमी योजनेपैकी एक अन्नभाग्य योजना आहे. जुलै 2023 ते जून 2024 या कालावधीत जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 613 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
गृहज्योती
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 10.30 लाख घरगुती वीज वापरकर्त्यांपैकी एकूण 9 लाख 93 हजार 547 पात्र लाभार्थ्यांना सरासरी वापराच्या आधारे दरमहा 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जात आहे.
गृहलक्ष्मी
गृहलक्ष्मी योजनेसाठी 11 लाख 87 हजार 469 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत 10 लाख 75 हजार 118 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. मागील 10 हप्त्यामध्ये 10.97 लाख लाभार्थ्यांना 2 हजार 195 कोटी 86 लाख थेट खात्यात जमा करण्यात आले आहेत.
युवा निधी
या योजनेंतर्गत जिल्ह्यातून 11 हजार 365 तरुणांनी नोंद केली आहे. त्यामध्ये 3 हजार 753 तरुण आणि 2 हजार 735 तरुणींचा समावेश आहे. यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने 7.43 लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 2.71 लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरम्यान 36 हजार 935 क्विंटल दर्जेदार बियाणांचे वितरण करण्यात आले आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 41,700 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. यासाठी सर्वेक्षणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 372.31 हेक्टरातील बागायती पिकांना फटका बसला आहे. त्यामध्ये केळी, पपई आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 17 घरे पूर्णपणे कोसळली आहेत. तर 203 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. 220 घरांना 31.32 लाख रुपयांची भरपाई वितरीत केली आहे.
30 काळजी केंद्रे सुरू
अतिवृष्टीमुळे 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यांना 34 लाख रुपयांची भरपाई वाटप केली आहे. तर 11 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. अशा जनावर मालकांना 3.73 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 5 पूरग्रस्त तालुक्यांमध्ये एकुण 30 काळजी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये 6712 जणांनी आश्रय घेतला होता.
4 नवीन बहुग्राम योजनांचा आराखडा तयार
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह 20 शासकीय आरोग्य संस्थांची अंदाजे 364 कोटी 44 लाख 83 हजार रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या इमारती पूर्णत्वाकडे आल्या आहेत. त्याबरोबर जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रात 25 बहुग्राम पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प कार्यरत झाले आहेत. 265 गावांना नदीच्या जलस्रोतांमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर 4 नवीन बहुग्राम योजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1444 कोटींची मंजुरी मिळाली आहे.