‘तरुण भारत’च्या हिंडलगा कॉर्पोरेट कार्यालयात स्वातंत्र्यदिन
बेळगाव : ‘तरुण भारत’च्या हिंडलगा येथील कॉर्पोरेट कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवनियुक्त संपादक विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तरुण भारतच्या सुरक्षा विभागाने शिस्तबद्ध असे पथसंचलन करण्यात आले. यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये तरुण भारतचे ज्येष्ठ उपसंपादक अजित दात्ये यांच्या हस्ते संपादक विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे आयटी विभाग आणि प्रिंटींग विभागाच्या तत्पर सेवेबद्दल या विभागाचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संपादक विजय पाटील यांनी आजचा क्षण आपल्यासाठी संस्मरणीय असून आपण तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर, कार्यकारी संचालक रोमा ठाकुर व समस्त ठाकुर परिवार तसेच संचालक सई व प्रितम बिजलानी यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत, असे सांगितले. या पदाची जबाबदारी सांभाळताना सर्व विभागांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी पत्रकार मनीषा सुभेदार यांनी स्वागत व प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. तसेच स्वातंत्र्य ही अत्यंत अनमोल गोष्ट आहे. स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते आणि आपले काम प्रामाणिकपणे व चोखपणे पार पाडून आपण आपली जबाबदारी पूर्ण करूया, असे त्यांनी सांगितले. सीएफओ उदय खाडिलकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी मुख्य व्यवस्थापक गिरीधर शंकर तसेच तरुण भारतच्या विविध विभागातील सदस्य उपस्थित होते.