शासकीय धान्य गोदामातील हमालांचे बेमुदत काम बंद आंदोलन
सांगली :
जिल्हयातील शासकीय धान्य गोदामामधील हमाल गेल्या चार महिन्यापासून हमाली, मजुरीपासुन वंचित असल्याने शुक्रवारपासून हमालांनी जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
थकीत हमाली मिळेपर्यंत शासकीय गोदामातील धान्य उचलले जाणार नसल्याचा इशारा हमाल नेते विकास मगदुम यांनी दिला. जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली रेशन दुकानदारांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात सांगली, मिरज, जत, आटपाडी, कवठेमहकांळ, पलूस, तासगाव, कडेगाव विटा-कार्वे, शिराळा, इस्लामपूर अशा ११ मुख्य अन्नधान्य गोदाम तसेच आष्टा, माहुली, ही दोन उपगोदामे आहेत, या गोदामामध्ये, गोदाम आणि व्दार वितरणासाठी माथाडी मंडळाचे नोंदणीकृती १६० हमाल काम करतात.
या हमालांना गेली आठ महिन्यापासून दर महाची, हमाली, मजुरी वेळेवर मिळत नाही, सध्या या हमालांना फेब्रुवारी ते जूनअखेर या चार महिन्याची तसेच द्वारवितरण व्यवस्थेतील चार महिन्याची हमाली, मजुरी अद्याप मिळालेली नाही. अन्न व नागरी पुरवठयाचे प्रधान सचिवांनी दरमहा हमालांना, हमाली, मजुरी देण्याबाबत आश्वासन दिले होते.
परंतू त्याची अमंलबजावणी झाली नाही, चार महिने हमालाना हमाली, मजुरी मिळाली नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत प्रशासन निर्णय घेत नसल्याने नाईलाजाने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याचे हमाल नेते विकास मगदुम यांनी सागितले. यावेळी वसंत यमगर, संजय नाईक, बाबसाहेब गडदे, शिवाजी हजारे, मनोहर पाटील, शिवाजी खोत, आबासाहेब खरात, शरद पावले, प्रकाश गुजले, सचिन कांबळे यांच्यासह हमाल उपस्थित होते.