महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंपन्यांचा महिला कर्मचाऱ्यांकडे वाढता कल

06:01 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंपनी व्यवस्थापन क्षेत्रात महिलांची अधिक प्रमाणात निवड-नेमणूक करून आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण आणि संख्या वाढविण्याचे आव्हान आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच कंपनी-व्यवस्थापनांपुढे उभे आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षात विशेष प्रयत्न केले आहेत.

Advertisement

यासंदर्भात नव्यानेच प्रकाशित झालेल्या संशोधन-अभ्यासानुसार भारतीय कंपन्यांपैकी सुमारे 63 टक्के व्यवस्थापन कंपन्या कर्मचाऱ्यांची निवड करताना महिला उमेदवारांना धोरणात्मक स्वरुपात प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी हे प्रमाण 41 टक्के वर होते. या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांच्या कर्मचारी निवडीच्या संदर्भात महिला उमेदवारांचा प्राधान्यासह विचार करण्याच्या प्रयत्नांचा विचार व्हायला हवा.

Advertisement

राजधानी दिल्लीतील ‘वुईएस’ या कर्मचाऱ्यांचा कौशल्य विकास, प्रशिक्षण-मार्गदर्शन क्षेत्रात विशेष स्वरुपात काम करणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार कंपनीने केलेल्या अभ्यासावर आधारित व प्रकाशित केलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत देशातील उद्योग-व्यवसायातील अधिकतर म्हणजे 63 टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी व त्यांनी अधिक अधिकार व जबाबदारीच्या पदावर काम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

याच संशोधनात सहभागी झालेल्या 86 टक्के कंपन्यांनी त्यांच्या भविष्यकालीन गरजा लक्षात घेता महिला कर्मचाऱ्यांमध्ये व्यवस्थापकीय गुण व नेतृत्व विकासावर भर देण्यासाठी विशेष प्रशिक्षणासारखे विकासात्मक प्रयत्न सुरु केले आहेत हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. या प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रामुख्याने नेतृत्व गुण, क्षमता विकास, धोरणात्मक विचार व निर्णय, परस्पर संबंध व प्रभावी संवादक्षमता या आणि यासारख्या विषयांवर भर दिला जात आहे.

आज एकीकडे प्रगत तंत्रज्ञान-संशोधन व प्रक्रियेचा अवलंब करण्यावर कंपन्यांचा भर असतानाच या नव्या बदल व प्रक्रियेमध्ये महिला कर्मचारी व व्यवस्थापकांना अधिकाधिक प्रमाणात सामावून घेण्यावर बऱ्याच कंपन्यांचा भर दिसून येतो. आज या सर्व क्षेत्रात महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीने पुढाकार घेत असल्याने आज उत्पादन क्षेत्रापासून अणुसंशोधन क्षेत्रापर्यंत महिला उमेदवार उपलब्ध होतात. याचे आता व्यवस्थापक आणि व्यवस्थापनक्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

याचाच परिणाम म्हणून आता प्रमुख कंपन्यांचे मुख्य वा मुख्याधिकाऱ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांच्या निवडीच्या संदर्भात मार्गदर्शक तत्व स्वरुपात प्रसारीत-प्रचारीत करण्यात येतात. सर्वेक्षणात नमूद केल्याप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांची निवड आणि विकास या मुद्यावर कंपनी स्तरावर व कंपनी अंतर्गत मार्गदर्शनपर व अनुभवांवर आधारीत सत्रांचे आयोजन करण्यात येते. अशा सत्रांचा सुद्धा आता सकारात्मक परिणाम दिसून येतो, असे मत ‘वुईएस’च्या सह संस्थापक  अनुरंजिताकुमार यांनी व्यक्त केले आहे. परिणामी काही कंपन्यांनी महिला उमेदवारांच्या मुद्याला व्यवस्थापन पातळीवर व धोरणात्मक स्वरुपात निश्चित केले आहे.

सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार आज व्यवस्थापन पद्धती स्वरुपात महिला कर्मचाऱ्यांच्या समावेशकतेचा स्विकार करण्यात आला आहे. सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या सुमारे 51 टक्के कंपनी-व्यवस्थापनांनी आपल्या व्यवस्थापन स्तरावरील एक प्रमुख व्यावसायिक उद्दिष्ट म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये विविध स्तरांवर महिलांच्या संख्या वाढीला प्रोत्साहन देणे, कर्मचारी निवडीच्या संदर्भात स्त्री पुरुष उमेदवारांमध्ये भेदभाव न करणे व कामाच्या ठिकाणी समावेशकता या मुद्यांचा समावेश केला आहे. या नव्या वैचारिक कार्यशैलीचा कंपनी अंतर्गत व सर्व स्तरांवर प्रसार-प्रचार करण्यासाठी अधिकांश कंपन्या या व्यवस्थापक व व्यवस्थापन स्तरावर विशेष संवादसत्र व प्रशिक्षणाचे आयोजन करीत आहेत. या प्रयत्नांचा आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहे हे विशेष.

त्याच सोबत कंपनी अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांनी अधिक मोठी, अधिकार व जबाबदारीची कामे करण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी महिला कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या विशेष प्रशिक्षण सत्रांमध्ये व्यवस्थापन शैली, व्यवसायवृद्धी, प्रभावशाली संवाद, निर्णयक्षमता, नेतृत्व विकास, परस्पर संबंध इ. चा समावेश केला जातो. या प्रशिक्षणामुळे महिला कर्मचाऱ्यांना विकास पदोन्नतीसाठी उपयोग होतो असा अनुभव आहे.

एकीकडे नव्याने कर्मचाऱ्यांची निवड करताना महिला उमेदवारांचा त्यांच्या कौशल्य व गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारेदेखील प्राधान्य तत्वावर विचार करत असतानाच आज वाढत्या संख्येत कंपनी-व्यवस्थापनांद्वारा महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विविधता, समानता व समावेशकता या व्यवस्थापन त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. या प्रयत्नांना अधिक गतिमान करण्यासाठी सुमारे 5 वर्षांपूर्वी 34 टक्के कंपन्या प्रयत्नशील होत्या तर आज हे प्रमाण सुमारे 51 टक्केवर गेले आहे. यावरून या विषयातील व्यवस्थापनांद्वारा घेतलेले गांभीर्य सहजपणे लक्षात येते. महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रामुख्याने नमूद करण्यासारखी बाब म्हणजे सध्या डीबीएस बँकेअंतर्गत जागतिक स्तरावर महिला कर्मचाऱ्यांची टक्केवारी 50 टक्के असून त्यापैकी उच्च व्यवस्थापन श्रेणीतील महिला व्यवस्थापकांचे प्रमाण सुमारे 40 टक्के आहे हे विशेष. बँकेच्या व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार भारतात सध्या डीबीएस बँकेत महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण सुमारे 30 टक्के असून आगामी तीन वर्षात महिलांची टक्केवारी 35 टक्केवर नेण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांच्या पूर्ततेसाठी बँकेतर्फे एका उच्चस्तरीय कार्यकारी समितीचे गठन केले असून या उच्च स्तरीय कार्य समितीतर्फे यासंदर्भात विशिष्ट कालावधीनंतर आढावा घेतला जातो. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मानव संसाधन विभाग प्रमुख किशोर पोदुरी यांच्यानुसार त्यांच्या या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम बँकेच्या व्यवस्थापनापासून व्यवसायापर्यंत सर्वदूर दिसू लागले आहेत. अशाच प्रकारचे प्रयत्न आणि उपक्रम डीसीएम श्रीराम उद्योग समूहांतर्गत केले जात आहेत. कंपनीने नव्या कर्मचाऱ्यांची निवड करताना विशिष्ट धोरणात्मक निर्णय घेतानाच नव्या जुन्या या उभय गटातील महिला कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाद्वारे विकासासाठी प्रशिक्षण, विकासासाठी विशेष उपक्रम प्राधान्य तत्वावर हाती घेतले आहेत. यासंदर्भात आपला अनुभव नमूद करताना डीसीएम श्रीरामचे व्यवस्थापकीय संचालक संदिप गिरोत्रा यांच्यानुसार महिलांच्या संदर्भातील धोरणांच्या निश्चितीकरणापासून त्याच्या अंमलबजावणीच्या कामापर्यंतची जबाबदारी उच्च व्यवस्थापनावर सुरुवातीपासूनच ठेवण्यात आली व त्याचा परिणाम अल्पावधीत व स्पष्टपणे दिसून येत आहे.

या शिवाय इतर बऱ्याच कंपन्या महिलांच्या संदर्भात विविधता, समानता व समावेशकता यावर भर देऊ लागल्या आहेत. याबाबत आपापला व्यवसाय, त्याचे स्वरुप व गरजांच्या प्राधान्यांसह प्रयत्न केले जात आहेत. यातून कर्मचाऱ्यांचे प्रमाण व त्यांच्या कामकाजाचा समतोल राखण्यात या कंपन्यांना यश येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भातील एक प्रमुख व महत्त्वपूर्ण यशस्वी उपक्रम म्हणून ‘स्नॅडर इलेक्ट्रिक’ कंपनीच्या पुढाकाराचा विशेष उल्लेख करावा लागेल. महिला कर्मचाऱ्यांचा विकास आणि प्रगतीसाठी 2015 पासून कंपनीमध्ये ‘उर्जा’ या उपक्रमाची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यात येत आहे. आजवर या प्रयत्नांतून स्नॅडर इलेक्ट्रिक कंपनीमध्ये 900 महिलांना विशेषत्वाने प्रशिक्षित करण्यात येऊन त्याचा फायदा महिलांच्या विकासापासून सर्वदूर दिसून येत आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article