स्लीपमेकर्सची वाढतेय मागणी
पैसे घेऊन गाढ झोपविण्याचे काम
माणसाला रात्री किती गाढ झोप लागते, हे त्याच्या जीवनातील समाधानावर अवलंबून असल्याचे बोलले जाते. जो रात्री गाढ झोपतो, तो स्वत:च्या आयुष्यात दु:खी राहत नसतो. तर जो त्रस्त असतो, त्याला गाढ झोप लागू शकत नाही. परंतु आता याकरता देखील लोक प्रोफेशनल हेल्प घेत आहेत. चीनमध्ये तर याकरता रितसर सर्व्हिस उपलब्ध आहे. धावपळीच्या जीवनात कधी तणाव तर कधी एकाकीपणामुळे झोपू न शकणाऱ्या लोकांना एक युवती गाढ झोपविते. याच्या बदल्यात तिला महिन्याभरात लाखोची कमाई मिळते. चीनमध्ये लोकांना विकासाचे मूल्य स्वत:ची झोप आणि स्वस्थपणा गमावून फेडावे लागत आहे. चीनमधील लोक चांगल्या झोपेसाठी पैसे खर्च करण्यास तयार आहेत. चीनमध्ये स्लीपमेकर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही मागणी खासकरून अशा लोकांची असते, जे आठवड्यातील 6 दिवस 12 तासांची नोकरी करत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात तणाव व्यापलेला आहे. स्लीपमेकर्स अशा लोकांच्या क्यथा ऐकून आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शांत करतात आणि झोपवितात.
काही काळापूर्वी मीच ही सर्व्हिस घेतली होती. यानंतर मी हे काम पार्टटाइम स्वरुपात करण्यास सुरुवात केली. मी लोकांच्या अशा समस्या ऐकून घेते, ज्या ते इतरांना सांगू शकत नाहीत. जेव्हा लोक स्वत:चे मन मोकळं करतात, तेव्हा त्यांना गाढ झोप लागते असे पार्टटाइम स्लीपमेकरचे काम करणारी ताओजी सांगते. हे काम केवळ लोकांना मन मोकळं करण्याचे नसून यात कमाई देखील चांगली होते. याच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. जर कुणी तासाच्या हिशेबानुसार सर्व्हिस घेत असेल तर 260 युआन म्हणजेच 3000 रुपये प्रतितास खर्च करावे लागतात. जर कुणी महिन्याभरासाठी फुलटाइम सर्व्हिस इच्छित असेल तर त्याला साडेतीन लाख रुपये द्यावे लागतात. बहुतांश क्लायंएट्सचे वय 30-40 वर्षांदरम्यान असते, जे केवळ स्वत:चे मन हलकं करू इच्छितात.