भारतातील वाढत्या ढगफुटीच्या घटना
भारतातल्या हिमालयाच्या पर्वतरांगांत वसलेल्या प्रदेशांत गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या कालखंडात ढगफुटींच्या घटना वाढलेल्या असून, त्यामुळे मनुष्यहानी त्याचप्रमाणे मालमत्ता आणि पिकांचे नुकसान होण्याची प्रकरणेही वाढत आहेत. यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्याने आणि सलामीलाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने आणि आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे.
सध्या जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडच्या चिसौती गावावरती झालेल्या ढगफुटीमुळे 137 जण बेपत्ता झाले होते आणि गावाची अक्षरश: भयानक दुर्दशा झालेली आहे. सध्या काहीजणांची मातीच्या ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात यश आलेले असले तरी 64 जणांचे मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेची व्याप्ती किती मोठी होती, याची कल्पना येते. हिमाचल प्रदेशात ढगफुटीने हाहाकार माजलेला असून राज्यात सातपेक्षा ज्यादा लोकांचा मृत्यू झालेला आहे. कुल्लू येथील बियास नदीला आलेल्या पुरामुळे रस्त्याचा भाग खचलेला असून त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होण्याबरोबर मालमत्तेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. सिमल्यातही भूस्खलन उद्भवल्याने तेथे प्रतिकुल परिस्थितीशी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. यात भर म्हणून की काय, कांगडा जिह्यात गेल्या सोमवारी रात्री भूकंपांचे हादरे बसल्याने लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाकिस्तानात उद्भवलेल्या ढगफुटीमुळे आणि त्यामुळे आलेल्या पुरापायी 670 लोकांचे मृत्यू झालेले आहेत. उत्तराखंडातही उद्भवलेल्या ढगफुटीमुळे तेथील जनजीवन बऱ्याच ठिकाणी विस्कळीत झालेले आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटलेला आहे. आज भारतात मान्सूनच्या पावसात ढगफुटीची प्रकरणे वाढत असून त्याचा तडाखा मनुष्यहानी होण्याबरोबरच तेथील अर्थव्यवस्थेला बसत आहे. जमिनीचा पृष्ठभाग तापल्यावर जमिनीने शोषलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन या पाण्याची वाफ आकाशात जाते. तेथे उंचावरच्या थंडाव्यामुळे वाफेचे रुपांतर पावसात होऊन डोंगराळ भागात ढगफुटी उद्भवते. आज जागतिक तापमान वाढीमुळे ढगफुटीच्या घटनांत वाढ होत असली तरी जेथे मोठ्या प्रमाणात धुवांधार पाऊस अल्पवेळात कोसळतो. शिवाय तेथील भूमीवरती अनिर्बंधपणे बांधकामे केल्याकारणाने आणि त्या परिसरातील वृक्षाच्छादन दुर्बल झाल्याने जमिनीची पावसाच्या माऱ्याला झेलण्याची क्षमता कमी झालेली असते आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण जास्त असते.
ढगफुटीचे प्रमाण सर्वसाधारणपणे डोंगराळ भागात अधिक असून, बऱ्याचदा गडगडाटासह वादळ वारे येतात. तेव्हा गरम हवेचे प्रवाह डोंगराच्या उतारावरून वर चढतात आणि तेथील कमी क्षेत्रात अल्पवेळेत प्रचंड पर्जन्यवृष्टी होते आणि त्यामुळे परिस्थिती बऱ्याचदा नियंत्रणाबाहेर जाते. पूरस्थिती निर्माण होते, पाण्याच्या तडाख्यात वृक्ष-वेली उन्मळून पडतात, मृदेची झीज होते, काही ठिकाणी भूस्खलनात वृद्धी होते. आकस्मिक पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने सांडपाण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन गैरसोयी उद्भवतात.
ढगफुटीच्या घटना गेल्या शंभर वर्षांपासून उद्भवत असून पनामात 29 नोव्हेंबर 1911 रोजी तीन मिनिटांमध्ये 63 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापनात झाली होती. 26 जुलै 2005 रोजी मुंबईजवळच्या सांताक्रुज वेधशाळेत 24 तासांत 944 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. 26 नोव्हेंबर 1970 रोजी केरिबियन बेटानजीक ग्वादालूपमध्ये एक-दोन तासात 2286 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. उत्तराखंडातील ऊद्रप्रयाग, चमोली आदी भागांत 16-17 जून 2013 मध्ये 479 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यात सुमारे 6000 जणांना मृत्यू आला होता. भारतीय हवामान विभागाच्या मानकांप्रमाणे 20 ते 30 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात एका तासात 100 मि.मी. पर्जन्यवृष्टी होणे म्हणजे ढगफुटी. गारपीट, विजेचा लखलखाट आणि गडगडाटासह धुवांधार पाऊस कोसळून ढगफुटीत लोकवस्तीयुक्त प्रदेशात परिस्थिती बिकट होऊन जाते.
ढगफुटीत एका एकर जागेत 70 हजार टन पाणी कोसळत असल्याने त्या परिसरातील उद्भवणारी परिस्थिती किती भयानक असते, याची जाणीव बऱ्याचदा झालेली आहे. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत दहा तासांत 1488 मि.मी. पर्जन्यवृष्टी होऊन शेकडो संसार मोडून पडले. कित्येक जीव गेले आणि जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईतल्या मिठी नदीचे अस्तित्व मानवी समाजाने आरंभलेल्या विकासाच्या प्रकल्पांमुळे संकटात आले आणि त्यामुळे पुरामुळे आलेल्या पाण्याचा विलक्षण तडाखा सोसण्याची वेळ तिथल्या लोकजीवनावर आली.
आपल्या देशात हिमालयाच्या उत्तरेकडील उताराच्या भागात ढगफुटीच्या धोक्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. गेल्या पाव शतकापासून या पर्वतीय प्रदेशातल्या पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्राची काडीमात्र दखल न घेता इथे येणाऱ्या देश-विदेशातल्या पर्यटकांच्या सोयीखातर हॉटेल्स आणि बंगले त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या प्रकल्पांत विलक्षण वाढ झालेली आहे. सिमला आणि अन्य मोक्याच्या ठिकाणी डोंगर उतारावर जी बांधकामे उभारली आहेत, त्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे ढगफुटीत कोसळणारा पाऊस येथील जीवितहानी आणि मालमत्तेची हानी करण्यास कारणीभूत ठरलेला आहे. एखाद्या प्रदेशाची किती बांधकामे धारण करण्याची क्षमता आहे, पर्जन्यवृष्टीवेळी पावसाच्या पाण्याचा कसा निचरा होईल, नदी-नाले महापुरातल्या पाण्याला कसे वाहून नेतील, याचा कोणी गांभिर्याने विचार करीत नसल्याने ढगफुटीवेळी उद्भवणारी परिस्थिती बिकट होत असते. आज ‘डॉपलर रडार’ आणि अवकाशातील उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे बऱ्याचदा एक-दोन तासाअगोदर ढगफुटीचा अंदाज बांधता येतो आणि त्यानुसार प्रभावित क्षेत्रातील लोकांचे वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा योग्यवेळी सक्रिय झाली तर नुकसानीचे प्रमाण कमी होणे शक्य असते. आज आम्ही आमच्या जगण्याला आवश्यक असणाऱ्या प्राणवायुचा पुरवठा करणाऱ्या जंगलांची दखल न घेता वृक्षाच्छादन नष्ट करीत आहोत आणि त्यामुळे जेव्हा ढगफुटीत धुवांधार पाऊस कोसळायला लागतो. तेव्हा होणारे नुकसानीचे प्रमाणही लक्षणीय असते. परंतु असे बऱ्याचदा झालेले असताना त्यातून वेळीच बोध घेऊन आम्ही तातडीच्या उपाययोजना करण्यात अयशस्वी झाल्याकारणाने त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगण्याची वेळ आपल्यावरती आलेली असते.
दक्षिण भारतातला जीवनाधार असणाऱ्या पश्चिम घाटात गेल्या काही वर्षांपासून ढगफुटी आणि भूस्खलनाच्या दुर्घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. केरळसारख्या देशात साक्षरतेच्या दृष्टिकोनातून अग्रेसर असणारे राज्य, अनियंत्रित शेती आणि बागायती पिकांचे क्षेत्र डोंगर उतारावरच्या भागात वाढल्याकारणाने आणि त्याचबरोबर खडीसाठी दगडफोडी करणाऱ्या खाणींत वाढ झाल्याकारणाने ढगफुटीच्या संकटाला समर्थपणे सामोरे जाण्यास अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ढगफुटीत मानवी मृत्यूच्या आणि मालमत्तेच्या नुकसानीच्या प्रमाणात इथे प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते. आज मानवी जीवनात नैसर्गिक आपत्तीमुळे जी अस्थिरता निर्माण झालेली आहे, तिला सामोरे जाण्यासाठी पर्यावरणीय साक्षरता व हवामान बदलाच्या संकटांना सामोरे जाण्याची सिद्धता आम्ही ठेवणे महत्त्वाचे झालेले आहे.
- राजेंद्र पां. केरकर