For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्पदंशाची वाढती प्रकरणे चिंताजनक

06:45 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्पदंशाची वाढती प्रकरणे चिंताजनक
Advertisement

आरोग्य खात्याकडून मार्गसूची जारी; उपचारासंबंधी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

कुत्रे चावण्याचे प्रकार जसे वाढीस लागले आहेत, त्या पाठोपाठ सर्पदंशाची प्रकरणेही वाढली आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यासह राज्यात सर्पदंशाच्या असंख्य घटना घडल्या असून वेळीच उपचार न झाल्याने सर्पदंश झालेली व्यक्ती दगावल्याची प्रकरणेही आहेत. शेतवडीत, परसात, घरातील अडगळीच्या ठिकाणी सर्पांचा वावर असतो. त्यामुळे सावधपणे काम करणे गरजेचे असते. जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या सुगीनंतर मळणीची कामे सुरू आहेत. गवताच्या गंज्यांमध्ये उब मिळण्यासाठी सर्प ठाण मांडून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूकतेने काम करणे जरूरीचे असते. मागील महिन्यात बेळगावजवळील बेळगुंदी परिसरात बुटामध्ये बसलेल्या सापाने तरुणाला दंश केला होता. चार दिवसांपूर्वी एका भागात मळणी सुरू असताना मळणी यंत्रामध्ये साप सापडून दोन तुकडे झाले. मात्र सापाच्या डोक्याकडील भागाने शेतकऱ्याला दंश केला होता. अशा प्रकरणावरून सापाबद्दल कायमच जागरूक राहणे गरजेचे आहे.

Advertisement

केवळ जिल्ह्यात नव्हेतर राज्यातही सर्पदंशाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. एका पाहणीनुसार राज्यामध्ये गेल्या 5 वर्षांत 42 हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाला आहे. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षात राज्यात 18 हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाला आहे. सर्पदंशाने मृत्यूचे प्रकारही घडले असून गेल्या 5 वर्षांत राज्यात 250 हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

सर्पदंश म्हणजे ‘हटकून आलेला आजार’ या सदराखाली येत असून सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनीही सर्पदंशाची प्रकरणे आरोग्य खात्याला कळविली पाहिजे. त्यामुळे राज्यात सर्पदंशाच्या किती घटना घडल्या याचा अंदाज मिळतो, असे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. 2030 सालापर्यंत म्हणजेच आगामी 5 वर्षांत सर्पदंशाची प्रकरणे निम्म्याहून कमी करण्याचे खात्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने सर्पदंश झालेल्याला त्वरित रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. आरोग्य खात्याकडून मार्गसूचीही जारी करण्यात आली आहे.

उपचाराचे शुल्क सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्टमार्फत सरकार भरणार

सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर आयुषमान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत उपचार करण्यात येणार आहेत. सर्पदंशाची व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यास त्याच्याकडून डिपॉझिटची मागणी न करता त्वरित उपचार सुरू करावेत, असे निर्देश आरोग्य खात्याने रुग्णालयांना दिले आहेत. सर्पदंश झालेल्याला उपचार केल्यानंतर रुग्णालयाचे शुल्क सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्टमार्फत सरकारच भरणार आहे.

सर्पदंश झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या जीवावर बेतू नये यासाठी सर्वच ठिकाणी उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपचारास विलंब झाल्यास जीवावर बेतण्याची शक्यता अधिक असते. एखाद्यावेळी सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ‘डेथ ऑडिट’ करण्यात येते. त्यामुळे सर्पदंशाचे स्पष्ट चित्र दिसून येते, असेही आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये, तालुका रुग्णालये, समुदाय आरोग्य केंद्रे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘अँटीस्नेक वेनम’ औषध मोफत उपलब्ध करून देण्यात येते. याद्वारे सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार करता येतात. सर्पदंश झाल्याची लक्षणे आढळून येताक्षणीच संबंधित व्यक्ती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून संमतीपत्र घेऊन औषध देण्यात येते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार कसे करावेत यासंबंधी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

घाबरून न जाता शांतपणाने निर्णय घ्यावेत

सर्पदंश झाल्यानंतर संबंधित व्यक्ती किंवा त्याच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता शांतपणाने निर्णय घ्यावेत. सर्पदंश झालेल्या ठिकाणी कपड्याने जखम बांधणे, जखम झालेल्या ठिकाणी कापणे किंवा तोंडाने विष ओढणे असे प्रकार करू नयेत. सर्पदंश झालेल्या भागावर काहीही न करता जखम मोकळी सोडावी. सर्पदंश झालेल्याला एका बाजूस झोपवून जखम उघडी राहील, त्याला धक्का बसणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यानंतर रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनातून संबंधित व्यक्तीला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करावे, असा सल्लाही आरोग्य खात्याने दिला आहे.

Advertisement
Tags :

.