महामेळाव्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ
मराठी भाषिकांची घेतली धास्ती
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. 8 रोजी व्हॅक्सिनडेपो परिसरात महामेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळनंतर टिळकवाडी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर रोजी काढलेल्या काळ्या दिनाच्या फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहून पोलिसांनी धास्ती घेत पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यासाठी शहरातील चार ठिकाणांची यादी पोलीस प्रशासनाकडे दिली होती. यापैकी व्हॅक्सिनडेपो मैदानावर सोमवारी सकाळी 11 वाजता महामेळावा होणार आहे. महामेळाव्याला शेकडोंच्या संख्येने सीमावासीय उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आल्यामुळे सीमालढ्याला धार आली आहे.
जानेवारी महिन्यात खटल्यावर सुनावणी होणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे महामेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. महामेळाव्याची धास्ती घेत पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली आहे. धर्मवीर संभाजी चौक, व्हॅक्सिनडेपो परिसर, छत्रपती शिवाजी उद्यान, रंगुबाई भोसले पॅलेस या परिसरात रविवारी सायंकाळनंतर पोलीस तैनात करण्यात आले. व्हॅक्सिनडेपो येथे बॅरिकेड्स घालण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती. काळ्या दिनाच्या सायकलफेरीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे पोलीस प्रशासनानेही मराठी भाषिकांची धास्ती घेतली आहे. रविवारी कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी यांनी व्हॅक्सिन डेपो परिसराला भेट देऊन तेथील पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. त्यांच्यासोबत टिळकवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी उपस्थित होते. टिळकवाडी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.