कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हलगा सांडपाणी प्रकल्पाला जमीन दिलेल्यांना वाढीव भरपाई?

02:14 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

बेळगावजवळील हलगा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना भरपाई वाढवून देण्यासाठी सरकार सरसावले आहे. या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत बुधवारी बेंगळुरातील विधानसौधमध्ये नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत नगरविकास, अर्थ आणि शहर पाणीपुरवठा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

बेळगावमध्ये 70 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी हलगा येथील 17 एकर 37 गुंठे आज्ण बेळगावमधील 1 एकर 12 गुंठे जमीन संपादित करण्यात आली होती. 10 वर्षांपूर्वी एकूण 19 एकर 9 गुंठे जमीन संपादित करून त्या मोबदल्यात भरपाई जाहीर करण्यात आली होती. परंतु, तत्कालिन सरकारने जाहीर केलेली भरपाई जमीन मालकांनी संमती न दर्शविल्याने न्यायालयात भरपाईची रक्कम जमा करण्यात आली होती. तसेच सरकारची भूसंपादन प्रक्रिया रितसर असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने निकाल दिला होता.

भरपाईच्या रकमेत वाढ करण्याच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव जिल्ह्यातील दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे.

याप्रसंगी मंत्री भैरती सुरेश म्हणाले, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारला सहानुभूती आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याबरोबरच बेळगाव शहराची स्वच्छता राखण्याची जबाबदारीही नगरविकास खात्याची आहे. या संदर्भात जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्याबाबत नियमांत तरतूद असेल तर भरपाई वाढवून देण्यात येईल. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी दहा वर्षांपूर्वी भरपाई जाहीर केली असल्याने त्यात पुन्हा सुधारणा करण्याची नियमांत कोणतीही तरतूद नाही, असे स्पष्ट केले.

...तर दूषित पाणी वापरावे लागेल : जारकीहोळी

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, एसटीपी युनिट न बसविल्यास नागरिकांना दूषित पाण्याचा वापर करावा लागेल. त्यामुळे हा प्रकल्प त्वरित राबवावा तसेच भरपाई वाढवून देण्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडून निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला.

भरपाई वाढवून द्या : हेब्बाळकर

महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली आहे. त्यांना भरपाईची रक्कम वाढवून द्यावी, अशी विनंती केली.

बैठकीत नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळन, अर्थखात्याचे (खर्च विभाग) सचिव रेजू, कर्नाटक शहर पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सेल्वमणी आदी अधिकारी सहभागी होते.

मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा!

हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. नियमांमध्ये भरवाईवाढ देण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे भरपाई वाढीसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेनंतर यावर निर्णय घेता येणार आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Next Article