मुतगे-सांबरा शेतकऱ्यांना वाढीव भरपाई
जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर : निलजी-सांबरा विमानतळ दरम्यानच्या रस्त्याचे करणार रुंदीकरण
वार्ताहर/सांबरा
निलजी ते सांबरा विमानतळ दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून, जमीन गमावलेल्या नागरिकांना वाढीव दराने नुकसानभरपाई देण्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जाहीर केले. सोमवारी प्रशासन, अधिकारी व जमिनी गमावलेल्या नागरिकांची संयुक्त बैठक मुतगे व सांबरा येथे पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. निलजी ते सांबरापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमिनी घेणार आहेत. मारुतीनगर ते निलजीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आता निलजी ते सांबरापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यासाठी जमिनी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी मुतगे येथील जमिनीला दर गुंठ्याला 9 लाख 25 हजार तर सांबरा येथील जमिनीला 13 लाख 65 हजार दर निश्चित करण्यात आला होता. मात्र येथील जमिनीवर अनेक नागरिकांचा उदरनिर्वाह चालत असल्याने जाहीर करण्यात आलेला दर कमी असल्याचे सांगत वाढीव दर देण्याची नागरिकांनी मागणी केली होती व महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन जमिनीला वाढीव दरवाढ देण्याची मागणी केली होती.
नागरिकांना नुकसानभरपाई देण्याचे जाहीर
त्यानुसार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सर्व्हे करून जमिनीला वाढीव दर देण्यात यावा अशा सूचना केल्या होत्या. नागरिकांच्या मागणीचा फेरविचार करून व सविस्तर चर्चा करून नागरिकांना वाढीव नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले. नवीन वाढीव दराप्रमाणे मुतगे येथील जमिनीला 12 लाख 74 हजार दर गुंठ्याला तर सांबरा येथील जमिनीला 15 लाख 17 हजार रुपये वाढीव नुकसानभरपाई देण्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले तर प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करून कागदपत्रांची पूर्तता करून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा करण्याचे सांगितले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता एस. एस. सोबरद, मारुती आदापूर, मुतगे पीडीओ बी. डी. कडेमनी, सांबरा पीडीओ सिद्धलिंग सरूर, तलाठी हळेमणी, विजयालक्ष्मी, जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य नागेश देसाई यांच्यासह ग्राम पंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष सर्व सदस्य व संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मुतगे येथील श्री भावकेश्वरी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यानंतर सांबरा येथे बैठक पार पडली.