दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनासाठी पुढील वर्षी तरी क्रेनची संख्या वाढवा
बेळगाव : गणेशोत्सवापाठोपाठ बेळगाव शहरात दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी ‘तरुण भारत’ने आवाज उठविल्यानंतर यावर्षी महानगरपालिकेने विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था केली खरी. परंतु दुर्गादेवीच्या मूर्तींची संख्या अधिक असल्यामुळे अनेक मंडळांना विसर्जनासाठी ताटकळत थांबावे लागल्याने काही मंडळांनी नाराजी व्यक्त केली. बेळगाव शहर तसेच उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. शहरासह तालुक्यात यावर्षी तब्बल 166 ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तीची मंडळांनी प्रतिष्ठापना केली. शहरात विसर्जनासाठी कपिलेश्वर तलावासह अनगोळ व जुने बेळगाव येथे व्यवस्था करण्यात आली होती. परंतु मध्यरात्रीनंतर कपिलेश्वर विसर्जन तलावात एकाचवेळी मंडळे दाखल झाल्याने विसर्जनासाठी विलंब झाला.
‘तरुण भारत’च्या मागणीला यश
दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी मागील वर्षी महानगरपालिकेने क्रेनची व्यवस्था न केल्याने मंडळांना स्वखर्चाने क्रेन आणावी लागली. तब्बल दोन ते तीन हजार रुपये खर्च करून प्रत्येक मंडळाने विसर्जन केले. याविरोधात ‘तरुण भारत’ने आवाज उठवला होता. याची दखल घेऊन यावर्षी एक क्रेनची व्यवस्था मनपाने कपिलेश्वर तलावावर केली होती. मंडळांची संख्या वाढली असल्याने एका क्रेनवर विसर्जनासाठी भार पडत होता. एका विसर्जनासाठी अर्धा ते पाऊण तास कालावधी लागत होता. त्यामुळे बऱ्याच मंडळांना विसर्जन तलावावर येऊन तासन्तास वाट पहावी लागली. त्यामुळे पुढील वर्षीपासून किमान दोन तरी क्रेन कराव्यात, अशी मागणी मंडळांनी केली आहे.