देवदासी महिलांच्या मासिक भत्त्यात वाढ करा
महिला विकास आणि संरक्षण संस्थेची राज्य सरकारकडे मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील पुनर्वसित आणि धर्मांतरित देवदासी महिलांसाठी देवदासी पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या महिलांच्या मासिक भत्त्यात वाढ करावी. या मागणीसाठी गुरुवारी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. समाजापासून दुरावलेल्या या महिलांना पुन्हा समाज व्यवस्थेत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी महिला विकास आणि संरक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आली. कर्नाटक सरकारने 2007-08 मध्ये 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या देवदासी महिलांना दरमहा 400 रुपये मंजूर केले होते.
नंतर काही वर्षांनी त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत सध्या मासिक 2 हजार रुपये दिले जात आहे. परंतु, सध्याच्या काळात वाढलेली महागाई व इतर खर्चांमुळे देवदासी महिलांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक देवदासी महिलेला किमान 5 हजार रुपये मासिक भत्ता द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. संस्थेचे सीईओ डॉ. सीतव्वा जोडट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देवदासी महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यास आपण प्रयत्न करू, असे मंत्री रहिम खान यांनी आश्वासन दिले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील देवदासी उपस्थित होत्या.