गोव्यात एमबीबीएसच्या 50 जागा वाढवा
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांच्याकडे मागणी : गृहमंत्री अमित शहा यांना गोव्यात येण्याचे दिले निमंत्रण
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या 50 जागा वाढवून देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना गोव्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. गोव्यात एमबीबीएस शिक्षणासाठी सध्या 200 जागा असून त्यातील 70 टक्के जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहेत. त्या जागा कमी पडत असून विद्यार्थी जास्त असतात म्हणून 50 जागा वाढवून देण्याची विनंती डॉ. सावंत यांनी नड्डा यांच्याकडे केली आहे.
प्रवेश न मिळाल्याने येते नैराश्य
एमबीबीएससाठी प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थी निराश होतात. नंतर ते इतर राज्यात किंवा परदेशात शिक्षणासाठी जातात. अनेकांची पात्रता असूनही त्यांना प्रवेश मिळत नाही, अशी परिस्थीती आहे. या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे यापुर्वीच पाठवण्यात आल्याची माहिती डॉ. सावंत यांनी नड्डा यांना दिली.
प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती
गोव्यात आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून नवीन आरोग्य उपकरणे, यंत्रणा साधनसुविधा यांची भर पडत आहे. त्यामुळे जागा वाढवणे महत्वाचे असून गोमंतकीय विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल असेही डॉ. सावंत यानी नड्डा यांच्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रीय आयोगाकडे पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्याची शिफारस डॉ. सावंत यांनी नड्डांकडे केली.
एसटी विधेयकाबद्दल दिले धन्यवाद
गोव्यातील एसटी समाजबांधवांना राजकीय आरक्षण देणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभा व राज्यसभेत मान्य केल्याबद्दल डॉ. सावंत यांनी नड्डांचे आभार मानले व त्यांना धन्यवादही दिले.
गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट
डॉ. सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून त्यांच्याशी गोव्यातील विविध विषयांवर चर्चा केली. गोव्यातील मंत्रीमंडळ फेरबदलाचा विषय चर्चेला आला की नाही ते मात्र समजू शकले नाही. एसटी बांधवांना गोवा विधानसभेत राजकीय आरक्षण देणारे विधेयक संसदेत संमत केले म्हणून मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शहा सप्टेंबरमध्ये येणार गोव्यात
माझी घर योजनेचा शुभारंभ करण्यासाठी अमित शहा यांना सप्टेंबर महिन्यात गोव्यात येण्याचे निमंत्रण डॉ. सावंत यांनी दिले आहे. त्यामुळे शहा हे त्यावेळी गोव्यात येण्याची शक्यता आहे. गोव्यातील राजकीय परिस्थितीवर डॉ. सांवत यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. संघटनात्मक कामे, पक्ष बळकट करणे, निवडणूक रणनिती यावरही निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.