सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दरात वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कांदे आणि बटाटे यांचा दर वाढल्याने सप्टेंबरात घाऊक महागाई दरात वाढ झाली असून तो 1.84 टक्के झाला आहे. ऑगस्टमध्ये तो 1.31 टक्के होता. सप्टेंबर महिन्यात डाळी आणि फळे यांच्या महागाईदरात काहीशी घट दिसून आली. तथापि, कांदे आणि बटाटे यांचे दर भरमसाठ वाढल्याचे दिसून आले.
ऑगस्टच्या तुलनेत कांद्याच्या दरात 78.1 टक्के तर बटाट्याच्या दरात 78.8 टक्के वाढ झाली आहे. टोमॅटोचे दरही अचानक वाढले आहेत. त्यामुळे घाऊक महागाई दर वाढला असून तो पुढील महिन्यात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबरात देशभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या तीन वस्तूंच्या दरावर मोठा परिणाम झाला. कांदे आणि बटाटे यांचे उत्पादन देशाच्या काही भागातच मोठ्या प्रमाणात होत असल्याने काहीवेळा वाहतुकीच्या अडचणीमुळे या वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविणे कठीण जाते आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठा हे समीकरण बिघडून दर वाढतात, असेही कारण दिले जात आहे.
भाज्यांच्या दरात वाढ
गेल्या वर्षीच्या सप्टेंबरशी तुलना करता यंदाच्या सप्टेंबरमध्ये एकंदरीत भाज्यांच्या दरात 49 टक्के वाढ दिसून आली. त्यामुळे घाऊक महागाई दर मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र, एकंदर महागाईदरात फार मोठी वाढ झाली नाही. कारण गेल्यावर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत या सप्टेंबरमध्ये इंधन आणि वीज यांच्या दरात साधारणत: 4 टक्के कपात झाली. तसेच उत्पादित वस्तूंच्या दरातही 1 टक्का घट झाली. परिणामी, घाऊक महागाई दर वाढूनही विशिष्ट मर्यादेत राहिला.
गेल्या महिन्याच्या तुलनेत...
ऑगस्टच्या तुलनेत घाऊक महागाई दरातील सरासरी वाढ 0.06 टक्के आहे. मात्र, अन्नपदार्थांची महागाई दरवाढ 1.1 टक्का आहे. उत्पादित वस्तूंचा महागाई दर 0.14 टक्क्यांनी तर प्राधान्य वस्तूंच्या महागाई दरात 0.41 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या संख्याशास्त्र विभागाने दिली आहे.
धान्यमहागाई दर
तृणधान्ये आणि तांदूळ यांच्या महागाई दरात काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, त्याचवेळी गव्हाची किंमत वाढली आहे. त्यामुळे धान्याचा महागाई दर सरासरी 1 टक्क्याने वाढला आहे. दुधाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.2 टक्के वाढ झाली असून ती नियंत्रणाच्या मर्यादेत आहे. अंडी, मांस आणि मासे यांच्या महागाई दरात 0.8 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तीन वस्तूंचे दर सलग दोन महिने स्थिर आहेत. प्रक्रियाकृत अन्नपदार्थ आणि उत्पादित अन्नपदार्थांच्या महागाई दरात सप्टेंबरमध्ये 5.5 टक्के वाढ झाली आहे. तर वनस्पती तेल आणि प्राणीज चरबीच्या महागाई दरात 10.5 टक्के वाढ झाली आहे. लसणाच्या किरकोळ दरात 500 रुपयांनी वाढ झाली असून ‘बिगबास्केट’ दरातही डिस्काऊंट वगळता 500 रुपयांची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.
पुढच्या दोन महिन्यांमध्ये...
बटाटे आणि कांदे यांच्या भडकलेल्या दरांमध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बाजारात नवे पीक आल्यानंतर दर कमी होतील. सध्याची वाढ ही तात्कालीक असून ती आहे त्याच पातळीवर राहणार नाही. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारांनी जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईवर सातत्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना तज्ञांनी केली आहे.