जीपीएस आधारीत टोल वसुलीत होणार वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जीपीएसवर आधारित टोल प्रणाली कार्यरत झाल्यानंतर महसुलामध्ये दहा हजार कोटींची भर पडू शकते अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटॅलाइट सिस्टीमवर आधारित टोल पद्धत लागू करण्यासंदर्भात ते बोलत होते. व्यावसायिक वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या टोल कलेक्शनमध्ये ट्रकचा वाटा हा 75 टक्के इतका जास्त असून नव्या जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून टूर कलेक्शनमध्ये दहा हजार कोटींची वाढ होऊ शकते असे गडकरी यांनी म्हटले आहे. जीपीएसच्या माध्यमातून पारदर्शक टोल वसुली होणार असून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 64,809 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेमध्ये पाहता टोल कलेक्शनमध्ये जवळपास 34 टक्क्यांची वाढ झाली असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
नवी जीपीएस प्रणाली लागू झाल्यास वाहतुकीवरचा होणारा खर्च कमी होणार आहे. दीर्घ पल्याचा प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना जीपीएसद्वारे टोल भरणे सोपे होणार असल्याने त्यांना विनासायास प्रवास करणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)जीपीएस आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणाली भारतामध्ये सुरू करण्यासंदर्भात बोली मागवली आहे.