बेळगाव-बैलहोंगल परिसरात चोरीच्या घटनात वाढ
चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद
बेळगाव : उपनगरात पुन्हा चोरट्यांचा वावर वाढला आहे. बाजार गल्ली, वडगाव येथे रविवारी रात्री दोन महिलांनी एका घराच्या पाठीमागे ठेवलेले पितळी साहित्य चोरल्याची घटना घडली. सदर महिलांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बैलहोंगलमध्येही एका चड्डी गँगने घरफोडीचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले. बाजार गल्ली, वडगाव परिसरात एका घराच्या बोळात ठेवलेली भांडी दोन महिलांनी पळविली आहेत. बॅटरीच्या प्रकाशात साहित्य शोधताना या दोन्ही महिलांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच अन्नपूर्णेश्वरीनगर परिसरात एका घराच्या खिडकीचे ग्रील कापून चोरीचा प्रयत्न झाला. ग्रील कापताना आवाज होऊन शेजाऱ्यांना जाग आल्यामुळे चोरट्यांनी पलायन केले.
एक वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका खतरनाक गुन्हेगाराने शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरात उच्छाद मांडला होता. वडगाव परिसरात पुन्हा चोऱ्या वाढल्या आहेत. बाजार गल्ली, वडगाव व अन्नपूर्णेश्वरीनगर परिसरात घडलेल्या चोरीच्या प्रयत्नांनी परिसरात खळबळ माजली आहे. यापूर्वी उच्छाद मांडणाऱ्या गुन्हेगाराविषयी माहिती मिळूनही अद्याप त्याला अटक झाली नाही. टिळकवाडी पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. आता पुन्हा उपनगरात चोरीचे प्रयत्न सुरू आहेत. बैलहोंगलमध्येही रविवारी गुन्हेगारांच्या एका टोळीने उच्छाद मांडला. एक अंगणवाडी व घर फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. बसवनगर बैलहोंगल परिसरात ही घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात गस्त वाढविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हाफ चड्डीवर आलेल्या या गँगचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.