उचगाव परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ
नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार
वार्ताहर/उचगाव
उचगाव परिसरातील चिकन सेंटरमधील टाकाऊ पदार्थ काही नागरिक गावात आणून कुत्र्यांना घालत असल्याने परिसरात कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याचा नाहक त्रास ग्रामस्थांना होत आहे. टाकाऊ पदार्थ टाकलेल्या ठिकाणी कुत्र्यांचे कळप जमा होत असून सदर ठिकाण धोकादायक आणि दुर्गंधीमय बनत चालले आहे. यासाठी परिसरातील ग्राम पंचायतीने तातडीने लक्ष देऊन यावर बंदी घालावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. या परिसरात सुळगा, उचगाव, तुरमुरी अशा भागामध्ये चिकन सेंटर मोठ्या प्रमाणात आहेत. या चिकन सेंटरमधून कोंबड्यांचे पाय टाकले जातात. सदर पाय खाण्यासाठी कुत्र्यांची चढाओढ सुरू असते. परिणामी जवळून कोणी गेल्यास त्यांच्यावरती कुत्र्यांचा कळप हल्ला करत आहे. यामुळे भीतीचे वातावरण असून नागरिकांच्या जीविताला धोका आहे. यासाठी या परिसरातील ग्राम पंचायतीने चिकन सेंटरना सांगून अशा टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावावी आणि नागरिकांच्या आरोग्याला होणारा धोका टाळावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.