बटाटा-जुना कांदा दरात वाढ, रताळी दरात मोठी घसरण
आवक घटल्याचा परिणाम : पावसाचाही परिणाम : भाजीपाला दर स्थिर
अगसगा/ सुधीर गडकरी
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कर्नाटक कांदा भाव प्रती क्विंटल 200 रुपयांनी वाढला. तसेच बेळगाव जवारी बटाटा आवकेत घट झाल्याने भाव वाढला असून 800 पासून 4000 रुपये क्विंटल झाला. इंदोरहून बेळगावला बटाटा आवक कमी आली होती व भाव मात्र स्थिर आहे. आग्रा बटाटा भावदेखील क्विंटलला स्थिर आहे. महाराष्ट्र जुना कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस घट निर्माण होत आहे. यामुळे जुना कांद्याचा भाव क्विंटलला 500 रुपयांनी वधारला. सध्या परराज्यामध्ये कुठलेही सण नसल्यामुळे रताळ्यांच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. याचा भाव क्लिंटलला 1500 ते 2800 रुपये सर्रास झाला आहे. तर काही ठिकाणी चुकून 3000 रुपयेदेखील भाव केला आहे. तर भाजीपाल्याच्या काही मोजक्याच भाज्यांचे दर किंचित वाढले असून इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. मात्र किरकोळ बाजारात भाजीपाल्यांची विक्री दुप्पट भावाने करीत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट नफा किरकोळ विक्रेतेच मिळवीत आहेत. दोन-तीन महिने काबाडकष्ट करून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र या अवकाळी पावसामुळे नुकसान होवून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाचा सामनाच करावा लागत आहे.
कर्नाटक कांदा आवकेत घट
सध्या कर्नाटकातील विविध ठिकाणांहून कांदा विक्रीसाठी बेळगाव एपीएमसीला येत आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे कांदा काही प्रमाणात खराब झाला आहे. वातावरण थंड असल्यामुळे कांदा अद्याप कच्चाच आहे. कांही कांद्यामध्ये पाणी गेल्याने कच्चा व ओला कांदा मार्केटमध्ये येत आहे. हा कांदा खरेदी करून परराज्यामध्ये किंवा इतर जिल्ह्dयांमध्ये जावून पोहचण्याआधी म्हणजे आठ दिवसांतच कांदा खराब होवू लागल्याने खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शनिवारी आवकेत घट निर्माण झाल्यामुळे कांदा भाव क्विंटलला दोनशे रुपयांनी वाढला.
जुना महाराष्ट्र कांद्याचा तुटवडा
महाराष्ट्रातील नाशिकमधील जुना कांद्याचा साठा जवळपास संपत आला आहे. यामुळे मार्केटयार्डला बाजारात विक्रीसाठी दोन ते तीनच ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. या जुन्या कांद्याला गोवा, कारवार, कोकणपट्ट्यासह बेळगावमध्घल हॉटेल, खानावळी व मांसाहारी खानावळी हॉटेल्समध्ये विशेष मागणी आहे. कारण जुना कांदा गिरवी बनविण्यासाठी आणि इतर पदार्थ बनविण्यासाठी चांगला असतो. व तेल कमी खातो. याचबरोबर खाण्यासाठी चवदार असतो. परिणामी तो खराब होत नाही. या कारणांमुळेच जुना महाराष्ट्र कांदा खरेदीदार वाढीव दर देवून खरेदी करतात. याचा भाव क्विंटलला 3500 ते 5700 रुपये झाला आहे.
बेळगाव बटाटा आवकेत घट
सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे काळ्या जमिनीतील काही प्रदेशातील बटाटा काढणीही थांबली आहे. तर पावसामुळे बटाट्याचा आकार देखील ओबडधोबड झाला आहे. गोलाकार झाला नाही. काळपट कलर आहे. असा बटाटा मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. बटाट्याला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. गिऱ्हाईकदेखील जास्त आहे. तरीसुद्धा अडत दुकानमधील बटाटा विकत नाहीत. कारण बटाट्याला व्यास्थित आकार नाही, कलर नाही, गोलाकार नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांना बटाटा विकणे मुश्किल बनले आहे. रताळी आवकेला मार्केटयार्डमध्ये सुरुवात झाली आहेत. रताळ्याची देखील क्वालिटी व्यवस्थीत येत नाहीत. सध्या कुठलेच सण नसल्यामुळे रताळी दरात घसरण झाली आहे, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
इंदोर बटाटा आवकेत घट
इंदोरमध्ये जानेवारी महिन्यामध्ये बटाटा काढणीला प्रारंभ होतो. त्यानंतर मार्चनंतर तेथील तेजी-मंदीचे व्यापारी बटाटा खरेदी करून मोठमोठ्या शितगृहांमध्ये साठवून ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये मागणीनुसार विविध बाजारात विक्रीसाठी पाठवतात. सध्या शितगृहामधील इंदोर बटाटा जवळपास संपत आला आहे. यामुळे मार्केटयार्डमध्ये कांही मोजक्याच दुकानांमध्ये इंदोर बटाटा विक्रीसाठी येत आहे. डिसेंबरपर्यंत याच बटाट्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. कारण इंदोरमध्ये सध्या बटाटा लागवड झाली असून त्याची काढणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महन्यामध्ये होणार आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
भाजीपाला भाव स्थिर
सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतवडीतील भाजीपाला काढणे मुश्किल बनले आहे. तर कांही भाजीपाला पाण्याने खराब झाला आहे. यामुळे काही भाज्यांचे दर किंचित वाढले आहेत. तर इतरांचे भाव स्थिर आहेत. भाजीमार्केटच्या दरापेक्षा दुप्पट दराने किरकोळ विक्रीते विक्री करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दुप्पट पैसे द्यावे लागत आहे. कष्ट केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.