मुनिर यांच्या अधिकारांमध्ये वाढ ?
घटनादुरुस्ती करण्यासाठी पाकिस्तानात प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानचे सर्व अधिकार आपल्या हाती घेण्याचा, त्या देशाचे लष्कर प्रमुख असिम मुनिर यांचा प्रयत्न आहे, हे गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेकदा दिसून आले आहे. मुनिर यांचे अधिकार प्रदीर्घकाळ टिकून रहावेत, यासाठी पाकिस्तानच्या घटनेत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी लवकरच घटना परिवर्तन विधेयक पाकिस्तानच्या प्रतिनिधीगृहात सादर करण्यात येणार आहे.
मुनिर यांची पाकिस्तानवरील पकड अधिक घट्ट व्हावी, अशा तरतुदी या घटना परिवर्तन विधेयकात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते त्यांच्या अधिकारपदांवरुन लवकर निवृत्त होणार नाहीत. मात्र, हे घटना परिवर्तन विधेयक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. घटना परिवर्तन होणार आहे, हे पाकिस्तानच्या जनतेला आणि जगाला काही दिवसांपूर्वीच कळले आहे. पाकिस्तानातील एक सत्ताधारी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे नेते बिलावल भुत्तो यांनी एका ‘एक्स’ संदेशाद्वारे ही योजना उघड केली आहे. पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांशी संपर्क साधला असून या घटना परिवर्तन विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना त्यांना केली आहे. हे विधेयक संमत होणे शक्य आहे.
विधेयकात काय आहे...
पाकिस्तानात घटना न्यायालये स्थापन करणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि न्यायाधाशांच्या बदल्या करण्याचे अधिकार लष्कर प्रमुखांकडे देणे, या या विधेयकातील तरतुदी आहेत. तसेच पाकिस्तानच्या घटनेच्या अनुच्छेद 243 मध्ये केला जाणारे संभाव्य परिवर्तन हा सर्वाधिक वादग्रस्त विषय ठरणार आहे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. या अनुच्छेदात पाकिस्तानचे लष्कर, त्याचे अधिकारी आणि त्यांचे अधिकार यांच्या संदर्भात तरतुदी आहेत. पाकिस्तानच्या लष्करावर तेथील लोकनियुक्त सरकारचे नियंत्रण असले पाहिजे, असे या अनुच्छेदात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
परिवर्तनासंबंधी गुप्तता
या घटनापरिवर्तन कार्यक्रमासंबंधी पाकिस्तान सरकारने कमालीची गुप्तता पाळली आहे. पाकिस्तानच्या काही समाजगटांकडून या विधेयकाला विरोध होण्याची शक्यता असल्याने ही गुप्तता पाळण्यात येत आहे. या घटनापरिवर्तनाच्या माध्यमातून मुनिर यांना प्रदीर्घकाळ लष्कर प्रमुख आणि फील्ड मार्शल या पदांवर राहण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांच्या अधिकारांचे संरक्षणही केले जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराला नागरी अधिकारांमध्ये हस्तक्षेप करता येणे सहज शक्य होणार आहे. एकप्रकारे पाकिस्तानात लष्करशाही आणण्याचेच हे प्रयत्न आहेत, अशी प्रतिक्रिया आणि चिंताही अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतावर काय परिणाम होणार...
सध्या पाकिस्तानचे सर्वाधिकार एकप्रकारे मुनिर यांच्या हातीच आहेत. या अधिकारांना घटनेचे संरक्षण मिळाल्याने मोठा फरक सध्याच्या परिस्थितीत पडत नाही. पाकिस्तानातील या अंतर्गत घडामोडींचा भारतावर थेट परिणाम त्वरित होणार नाही. तसेच पाकिस्तानमध्ये आजपर्यंत अनेकदा लष्करशाही आलेली आहे. त्या लष्करशाहीमुळे भारताच्या धोरणांवर किंवा स्थितीवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे याहीवेळी काही नवे घडत नसून लष्करशाहीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. मात्र, मुनिर हे कट्टर धर्मवादी म्हणून परिचित आहेत. तसेच त्यांना भारतासंबंधी कमालीचा आकस आहे. त्यामुळे त्यांच्या हाती अधिक अधिकार आल्यास ते भारताला अधिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. भारताच्या ‘सिंदूर अभियाना’त पाकिस्तानने प्रचंड मार खाल्ला. यासंबंधी डूख धरुन मुनिर भारताला धोका देण्याचा प्रयत्न करतील, हे गृहित धरुन भारताने आपल्या पुढच्या चाली रचल्या पाहिजेत, असे मतप्रदर्शन अनेक जागतिक तज्ञांनी केले.