नारळ-खोबऱ्याच्या एमएसपीमध्ये वाढ
2026 च्या हंगामासाठी किमान आधारभूत किंमतीत 400 ते 445 रुपये वाढ : नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नववर्षाची भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट देत खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळांतर्गत शुक्रवारी झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) 2026 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आता 2026 च्या हंगामासाठी वाटी खोबऱ्याच्या (मिलिंग कोपरा) किमान आधारभूत किमतीत 445 रुपयांनी वाढ करून 12,027 रुपये प्रतिक्विंटल केले आहे. तर अख्ख्या खोबऱ्याचा (बॉल कोपरा) एमएसपी 12,500 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने 2026 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व आवश्यक पिकांसाठीचा किमान आधारभूत किमतीचा दर संपूर्ण भारतातील उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट निश्चित केला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार आता नारळ-खोबऱ्याच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. वाटी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल 445 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर गोळा खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल 400 ने वाढ करण्यात आली आहे.
नारळ उत्पादकांना दिलासा
जास्त किमान आधारभूत किमतीमुळे नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळण्यासोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळ उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नारळाचे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन मिळेल, असा दावा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. शेतकऱ्यांकडून नारळ खरेदी करण्यासाठी भारतीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ किंमत समर्थन योजनेअंतर्गत खोबऱ्याच्या खरेदीसाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम करत राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.