Satara Crime : साताऱ्यात बेपत्ता प्रकरणांत वाढ; पोलिसांकडून तपास सुरू
साताऱ्यात बेपत्ता प्रकरणांची मालिका
सातारा : सातारा शहर परिसरातून वेगवेगळ्या घटनेत चौघेजण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलगी, महिला, वृद्ध व युवकाचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ही घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेतल्यानंतरही ती सापडली नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, हॉटेलमध्ये कामाला जातो, असे सांगून युवक घरातून गेला. मात्र तो परत आला नाही. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपासपोलीस हवालदार भोसले करीत आहेत. तिसऱ्या घटनेत, वृद्ध घरातून बाहेर गेल्यानंतर ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतरही ते सापडत नसल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत. चौथ्या घटनेत, सातारा शहर परिसरात राहणारी महिला घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.