For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात बिबट्यांच्या संख्येत वाढ

06:30 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतात बिबट्यांच्या संख्येत वाढ
Advertisement

भारतातल्या बिबट्यांच्या वाढत्या संख्येसंदर्भातला अहवाल, गेल्याच आठवड्यात केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे प्रसारित करण्यात आल्याने, त्याद्वारे इथल्या कायद्याने संरक्षित जंगलात आणि अन्य वनक्षेत्रात बिबट्यांच्या एकंदर स्थितीवरती प्रकाश पडलेला आहे. शेकडो वर्षांपासून भारतातल्या जंगलात पांथेरा कुळातील पट्टेरी वाघ, बिबटा ही शान असून, आज मानवी समाजाचा संघर्ष या जंगली श्वापदाशी निर्माण झाल्याकारणाने त्यांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे स्पष्ट झालेले असले, तरी त्यांचे अस्तित्व दिवसेंदिवस संकटग्रस्त झालेले आहे.

Advertisement

पट्टेरी वाघ आणि बिबट्यासारख्या प्राण्यांचे वास्तव्य जंगलात असणे, हे तृणहारी जंगली श्वापदांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रभावी मानले जायचे. निसर्गाच्या एकंदर अन्न साखळीत पट्टेरी वाघ, बिबट्यासारखे प्राणी शिखर स्थानी असून, पर्यावरणाचे संतुलन ठेवण्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने 29 फेब्रुवारी, 2024 रोजी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात 2018 साली बिबट्यांची संख्या 12,852 होती. त्यात 2022 साली वृद्धी होऊन ती संख्या 13,874 झालेली आहे. भारतीय उपखंडात भारत, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तानातल्या काही भागांत विविध प्रकारच्या जंगलांत बिबट्यांचे वास्तव्य असून, आफ्रिकेतल्या इथिओपियामधून त्याचे आगमन झाल्याचे मानले जाते.

प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार मध्य भारत आणि पूर्व घाट प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 8,820 इतकी बिबट्यांची संख्या असून, पश्चिम घाटात 3596 तर शिवालिक पर्वत आणि गंगेच्या मैदानी प्रदेशात त्यांची संख्या 1109 असल्याचे स्पष्ट झालेले आहे. देशभरातल्या राज्यांत, मध्यप्रदेशात सर्वाधिक बिबट्यांची संख्या मध्य प्रदेशात 3907 असून, त्याच्या खालोखाल महाराष्ट्रात 1985, कर्नाटकात 1879 आणि तामिळनाडूत 1070 बिबट्यांची संख्या असल्याचे अहवाल सांगतो. पट्टेरी वाघांच्या संख्येप्रमाणे बिबट्यांच्या संख्येत वाढ होत नसून, या अहवालानुसार 2018च्या तुलनेत 2022 साली 1022 बिबट्यांची संख्या वाढलेली असली तरी काही राज्यांत मानव-बिबटा संघर्ष टोकाला गेल्याने, बिबट्यांसारख्या प्राण्यांची शिकार वाढत चालली आहे. शिवालिक पर्वत आणि गंगेच्या मैदानी प्रदेशात बिबट्यांची संख्या कमी होत असून, वार्षिक दर 3.4 टक्क्यांवरती घसरलेला आहे, ही चिंतेची बाब आहे. इथे 2018 साली बिबट्यांची संख्या 1253 होती. त्यात 2022 साली घट होऊन ती 1109 इतकी झालेली आहे. देशाच्या काही राज्यांत बिबट्यांची संख्या खालावत चालल्याचे स्पष्ट झालेले आहे. ओडिशासारख्या राज्यात बिबट्यांची संख्या 2018 साली 760 होती. ती 2022 मध्ये 652 झाली. केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार आणि गोव्यात बिबट्यांची संख्या घटत आहे.

Advertisement

उत्तराखंडातल्या राजाजी आणि जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात आणि रामनगर वनक्षेत्राच्या विभागात बिबट्यांच्या संख्येत विलक्षण तफावत आढळलेली आहे. राजाजी आणि कॉर्बेटमध्ये बिबट्यांची संख्या स्थिर असून, रामनगरमध्ये लक्षणीय घट झालेली दिसून आलेली आहे. त्याला इथे असणारी पट्टेरी वाघांच्या संख्येची घनता हे कारण असू शकते, असा वन्यजीव संशोधकांचा कयास आहे. बिबट्याची संख्या कमी होण्यामागे त्यांचा नैसर्गिक अधिवास संकटग्रस्त असून, बिबट्यांची कातडी, हाडे, नखे आदी अवयवांसाठी शिकार आणि तस्करी होत असल्याने त्यांचे अस्तित्व धोकादायक वळणावरती पोहोचलेले आहे. महामार्ग, लोहमार्ग ओलांडताना झालेल्या अपघातांत बिबटे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणही बरेच लक्षणीय झालेले आहे. काही ठिकाणी पट्टेरी वाघांची संख्या वाढल्याने त्याचा ताण नैसर्गिक अधिवास आणि अन्नाच्या स्रोतांवरती पडत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. परंतु असे असले तरी भारतातल्या बऱ्याच व्याघ्र राखीव क्षेत्रांतच बिबटे अधिक सुरक्षित असल्याचे दिसून आलेले आहे.

मध्य प्रदेशमध्ये पट्टेरी वाघ सुरक्षित असल्याकारणाने त्याच्यासोबत बिबट्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाला प्राधान्य दिल्याने, त्यांचे अस्तित्व सुरक्षित असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पट्टेरी वाघांच्या तुलनेत बिबटा घनदाट जंगले वगळता शेती आणि बागायतीच्या क्षेत्रात वास्तव्यास असून, तेथे उपलब्ध होणाऱ्या भटके कुत्रे, गुरे-ढोरे आणि अन्य अन्न स्रोतांद्वारे जगत असल्याकारणाने, त्यांचा संघर्ष तेथे वास्तव्यास असणाऱ्या मानवी समाजाशी निर्माण झालेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी ऊसासारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून, जंगल आणि वृक्षांची कत्तल होत असल्याने बिबट्यांनी उसाच्या मळ्यात तळ ठोकण्याला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे मानव-बिबटा यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलेला असून अशा जागी बिबट्यांच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी आणि माणसांकडून झालेल्या हल्ल्यात बिबट्यांचे मृत्यू उद्भवलेले आहेत. उत्तराखंडासारख्या राज्यात 2018 साली 839 बिबटे होते. त्यात 2022 साली घट होऊन, ही संख्या 652 झालेली आहे. उत्तराखंडात मानव-बिबटा यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचलेला असून, गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात जंगली श्वापदांच्या हल्ल्यात जखमी आणि मृत्यू होण्याची जी 2000 प्रकरणे नोंद झालेली आहेत, त्यात बिबट्यांशी निगडित 570 प्रकरणे आहेत.

केरळसारख्या राज्यातही बिबटा संकटग्रस्त असून बिबट्यांच्या हल्ल्यात माणसे आणि पाळीव प्राण्यांचेही मृत्यू उद्भवलेले आहेत. 2013 ते 2019 या काळात केरळात 173 पाळीव प्राण्यांच्या मृत्यू आणि जखमी होण्याची प्रकरणे उद्भवलेली आहेत. तामिळनाडूत कॉफी, चहाचे मळे आणि अन्य नगदी पिकांची केली जाणारी शेती, बागायती तसेच लोकवस्तीचा विस्तार बिबट्यांसाठी प्राणघातक ठरल्याचे स्पष्ट झालेले आहे. संपूर्ण देशात राजस्थानातल्या अलवार जिल्ह्यातल्या सारिस्का व्याघ्र राखीव क्षेत्रात बिबट्यांची घनता सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 100 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 21.43 बिबटे असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

मार्जार कुळात सिंह आणि वाघ यांच्या पाठोपाठ आकारमानाने बिबट्याचा क्रमांक असून, मार्जार कुळात त्यांची संख्या आजच्या घडीस सर्वाधिक आहे. दिवसातील काही काळ झाडावरच वास्तव्य करणारा बिबटा निशाचर असतो. वाघ-सिंहापेक्षा नरभक्षक झालेला बिबटा अधिक धोकादायक असतो. आपली शिकार इतर मांसाहारी प्राण्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बिबटा मारलेले भक्ष्य तोंडात धरून झाडांवरती चढतो. बिबटा तृणहारी जंगली प्राण्यांपेक्षा पाळीव प्राण्यांची शिकार करत असला तरी प्रसंगी भटके कुत्रे, माकडे, उंदरासारख्या प्राण्यांबरोबर किडेदेखील खाऊन गुजराण करत असतो. त्यामुळे जेव्हा जंगलांचा प्रकर्षाने ऱ्हास होऊ लागला तेव्हा बिबट्यांनी शेती, बागायतींबरोबर चक्क औद्योगिक वसाहतीच्या शेजारी वास्तव्य केल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे बिबटा-मानव यांच्यात निर्माण झालेला संघर्ष धोकादायक वळणावरती येऊन पोहोचलेला आहे आणि दिवसेंदिवस बिबट्याविषयीचा विनाकारण भयही वाढत जाऊन, त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.