भारताच्या विकासदर अनुमानात वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जागतिक बँकेने भारताच्या 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या विकासदर अनुमानात वाढ करुन तो 7 टक्के राहील असे स्पष्ट केले आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये पाऊस समाधानकारक झाल्याने कृषीक्षेत्राचा विकासदर अधिक राहील. तसेच ग्रामीण भागातील मागणीतही वाढ होण्याची शक्यता असल्याने या वित्तवर्षाचा सरासरी विकास दर 7 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल, अशी शक्यता बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात आहे.
जागतिक बँकेने यापूर्वी व्यक्त केलेले विकासदराचे अनुमान 6.5 टक्के ते 6.8 टक्के होते. तथापि, आता मागणीत वाढ होत आहे. अर्थव्यवस्था गतीमान होत आहे. पाऊस चांगला झाल्याने कृषी उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. भारताचे उद्योगक्षेत्रही बऱ्याच प्रमाणात कृषीवर आधारित आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रातही विकासदर वाढेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. एकंदर स्थिती अनुकूल असल्याचे दिसते, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामीण विकासावर भर
केंद्र सरकारने आपल्या गेल्या 10 वर्षांच्या कार्याकालात ग्रामीण विकासावर भर दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भारताचा विकासदर शहरी भारताच्या विकासदरापेक्षाही जास्त राहिला आहे. हाच कल या आर्थिक वर्षातही असेल, असे मत अनेक अर्थतज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केले होते. या मताला जागतिक बँकेच्या नव्या अनुमानाने बळ मिळाले आहे. सध्या भारत जगातील सर्वाधिक दराने विकास पावणारा देश म्हणून ओळखला जातो. ही भारताची ओळख या आर्थिक वर्षातही कायम राहण्याची शक्यता आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाल्यास तिचा विकासदरावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.