For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढत्या उष्णतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ

10:34 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाढत्या उष्णतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ
Advertisement

अडीच महिन्यांत विविध ठिकाणी 97 घटना : गवत गंज्यांचा सर्वाधिक समावेश

Advertisement

बेळगाव : उन्हाचा तडाखा जसजसा वाढू लागला तसतशा आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. 1 जानेवारी ते 15 मार्चपर्यंत या अडीच महिन्यांच्या कालावधीत बेळगाव शहर व तालुक्यात तब्बल 97 घटनांची नोंद अग्निशमन विभागाकडे झाली आहे. वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने मालमत्तेचे नुकसान टाळणे शक्य झाले. परंतु आगीच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. बेळगाव शहराचा पारा दिवसा 34 ते 35 अंशांपर्यंत पोहोचत आहे. वाढत्या उष्णतेमुळे ज्वलनशील पदार्थ लगेच पेट घेतात. तसेच जुन्या खराब झालेल्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किट होऊन घर तसेच दुकानांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आग लागणार नाही, याची खबरदारी नागरिकांनी स्वत:हून घेणे गरजेचे आहे. आग लागल्यास तात्काळ अग्निशमन दलाला कळवावे, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.

गवत गंज्यांचे नुकसान

Advertisement

ग्रामीण भागात गेल्या महिन्याभरामध्ये अनेक ठिकाणी गवत गंज्यांना आगी लावण्यात आल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी चुलीतील राख गवत गंजींच्या शेजारी टाकली जाते. यामुळे गवत गंज्यांना आग लागल्याचे प्रकार घडत आहेत. काही विघ्नसंतोषी नागरिक जळती सिगारेट अथवा माचीसची काडी गवतामध्ये टाकत असल्यामुळे आग भडकली जात आहे. आधीच यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने गवताचा तुटवडा जाणवत असताना आग लागण्याच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

गॅस दुर्घटनांचे वाढते प्रमाण

सिलिंडर गळतीमुळे आग लागण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत वाढल्या आहेत. बसवाण गल्ली येथे दुर्घटनेत तिघांना जीव गमवावा लागला होता. तर खडेबाजार येथे दुकानाला आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले होते.

सर्वाधिक घटना ग्रामीण भागात

बेळगाव शहरासह परिसरात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील अडीच महिन्यांत 97 घटना घडल्या असून यामध्ये सर्वाधिक आग लागण्याच्या घटना ग्रामीण भागात झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

- शिवाजी कोरवी (बेळगाव अग्निशमन अधिकारी)

आग लावण्याच्या प्रकारामुळे शेतकरी संकटात

सद्या शेतकरी दुष्काळाचा सामना करत असताना समाजकंटकांकडून मात्र गवत  तसेच भाताच्या गंज्यांना आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जनावरांच्या चाऱ्याची तजविज करताना मोठी कसरत करावी लागत आहे. समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. येळ्ळूर, मच्छे, झाडशहापूर, सुळगा (ये.), अनगोळ, धामणे, बेकिनकेरे, कडोली, आदी भागात गवतगंज्यांना आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. एक तर शेतकऱ्यांना दुष्काळामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यातच अशा प्रकारे समाजकंटक आग लावत आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. वर्षभर काबाडकष्ट करायचे, त्यानंतर जनावरांसाठी चारा, रचून ठेवायचा. अचानकपणे त्या गंज्यांना आग लावली जाते. यामुळे आम्ही जीवन जगू कसे, असे शेतकरी म्हणू लागला आहे. सोमवारी रात्री झाडशहापूर येथे गवतगंज्यांना आग लावण्यात आली. त्यामध्ये जवळपास 5 ट्रॉली जनावरांचा चारा जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. हे प्रकार समाजकंटकांकडून केले जात आहेत. मात्र या समाजकंटकांना आवर कसा घालायचा? असा प्रश्न पडला आहे. मुक्या जनावरांचा चारा अशा प्रकारे पेटवून दिला जात आहे. यामुळे समाजातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पिके खराब झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही प्रमाणात भात पीक घेण्यात आले. त्याचा चारा साठवून ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी असलेले करड (गवत) कापून ते देखील रचण्यात आले होते. मात्र त्याच गंज्यांना आग लावण्यात येत आहे. गवत जळून गेल्यानंतर आता जनावरांना चारा कोठून उपलब्ध करायचा? असा प्रश्न आता या शेतकऱ्यांसमोर पडला आहे. चारा कमी असल्यामुळे चाऱ्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत. सध्या विहिरी, कूपनलिका यांचे पाणीदेखील कमी झाले आहे. त्यामुळे ओला चारा मिळणेही अवघड झाले आहे.

Advertisement
Tags :

.