वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ
बेळगाव जिल्ह्यात 2 हजार 803 प्रकरणांची नोंद : कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात वीजचोरीच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. हेस्कॉमकडून परवानगी न घेता छुप्या मार्गाने वीज कनेक्शन घेऊन विजेचा वापर केला जात आहे. विशेषत: शेती, बांधकाम, उद्योग यासाठी वीजचोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे. बेळगाव जिल्ह्यात वीजचोरीची 2803 प्रकरणे नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शेतीसाठी मोफत वीज असतानाही मीटर घेण्यासाठी लागणारा खर्च टाळून काही जण थेट वीजवाहिन्यांना आकडा टाकून वीजचोरी करतानाचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर सण, उत्सव या काळात टेम्पररी मीटर न घेता थेट कनेक्शन घेतले जाते. घराचे बांधकाम करताना हेस्कॉमकडून टेम्पररी कनेक्शन घ्यावे लागते. परंतु, टेम्पररी कनेक्नशचा येणारा खर्च टाळून आजूबाजूच्या घरातून वीजवाहिन्यांद्वारे कनेक्शन घेतले जाते. ही एक प्रकारची वीजचोरी असून हेस्कॉमकडून अशांवर गुन्हे दाखल केले जातात.
17805 वीजचोरीची प्रकरणे नोंद
हुबळी वीज सप्लाय कंपनीअंतर्गत धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गदग, हावेरी आणि उत्तर कन्नडा जिल्ह्यांचा समावेश होतो. जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत हेस्कॉम अंतर्गत 17 हजार 805 वीजचोरीची प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत 30.62 कोटी रुपये दंड जमा करून घेण्यात आला आहे. यापैकी 15 हजार 554 प्रकरणे निकालात काढण्यात आली असून, उर्वरित प्रकरणे प्रलंबित आहेत.
ग्राहक वीजमीटरच्या प्रतीक्षेत
मार्च 2025 पासून अनधिकृत वसाहतींमधील बांधकामांना वीजमीटर देणे बंद करण्यात आले आहे. बांधकाम परवान्यासह ओसी व सीसी प्रमाणपत्र असलेल्यांनाच वीजमीटर दिले जात आहे. यामुळे बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील अनेक ग्राहक वीजमीटरच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे बांधकामांसाठी वीजचोरीचे प्रकार वाढले आहेत. इतर घरांमधून अथवा थेट वीजवाहिन्यांना आकडा टाकून वीजचोरी करीत असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत.
चिकोडी विभागात सर्वाधिक वीजचोरी
बेळगाव जिल्ह्यातील हेस्कॉमच्या चिकोडी विभागात सर्वाधिक वीजचोरीच्या घटना घडल्या आहेत. 2 हजार 892 प्रकरणांची नोंद झाली असून ही हेस्कॉम विभागातील सर्वाधिक आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वीजचोरीच्या घटना वाढत असल्याने हेस्कॉमचे व्हिजिलन्स पथक वीजचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करते.