विद्युत ग्राहकांच्या तक्रारीत सर्व्हरडाऊन मुळे वाढ
बेळगाव : हेस्कॉमचा सर्व्हर मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. टेम्पररीसह कायमस्वरुपी कनेक्शन देण्यात विलंब होत असल्याने शनिवारी झालेल्या तक्रार निवारण बैठकीत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सर्व्हर सोबतच विजेसंबंधीच्या इतर समस्या बैठकीत मांडण्यात आल्या. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हेस्कॉमची तक्रार निवारण बैठक घेतली जाते. शनिवारी शहरासह ग्रामीण भागातील उपकेंद्रामध्ये बैठक पार पडली. गांधीनगर येथे झालेल्या ग्रामीण विभागाच्या बैठकीत विविध समस्या मांडण्यात आल्या. सुतगट्टी येथील पेट्रोल पंपावर बसविण्यात आलेल्या सोलार रिडिंग विषयीची माहिती, टेम्पररी कनेक्शनची अनामत रक्कम पुन्हा ग्राहकाला मिळणे यासोबत कृषी पंपांविषयी तक्रारी मांडण्यात आल्या. तक्रारी त्वरित निवारल्या जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करुर, संजीवकुमार सुकसारे, ए. एम. शिंदे यांच्यासह हेस्कॉमचे कर्मचारी उपस्थित होते.