तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलनात वाढ
जून तिमाहीत हा आकडा 9.8 टक्क्यांनी तेजीत: सरकारी तिजोरीला मिळाले बळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2025 च्या जून तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलन 4.62 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-जून तिमाहीत ते 9.81 टक्क्यांनी वाढले आहे. उपलब्ध डाटाच्या माहितीनुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, 16 जूनपर्यंत एकूण कर संकलनात कंपनी कराचा वाटा 1.81 लाख कोटी रुपये होता आणि वैयक्तिक आयकराचा वाटा 2.69 लाख कोटी रुपये होता.
अधिकाऱ्याने सांगितले की, यामध्ये आगाऊ कर संकलनाचाही समावेश आहे, जे सुमारे 1.48 लाख कोटी रुपये होते. आगाऊ कराचा पहिला हप्ता जमा करण्याची अंतिम तारीख 15 जून होती. परंतु करदात्यांना जारी करण्यात येणारा निव्वळ परतावा वजा केल्यानंतर, 16 जूनपर्यंतचे कर संकलन चालू आर्थिक वर्षातील सरकारच्या कर महसुलाच्या अंदाजापेक्षा कमी राहिले आहे.
अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने कंपनी आणि वैयक्तिक आयकरात 13-13 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र ‘हे आकडे तात्पुरते आहेत आणि ते 16 जूनपर्यंत केलेल्या पेमेंटचा संदर्भ देतात, असेही एका अधिकाऱ्याने यावेळी सांगितले आहे.
दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी बँका उघडतील तेव्हा आकडा बदलला पाहिजे आणि उच्च झाला पाहिजे. 16 जूनपर्यंत एकूण 5.15 लाख कोटी रुपये कर संकलन होते. आयकर विभागाने 16 जूनपर्यंत 53,140 कोटी रुपये परत केले होते. सुरुवातीचे आकडे सांगत आहेत की जून तिमाहीत कर संकलन चांगले झाले आहे. इतर करांमध्ये 11,605 कोटी रुपयांचा सिक्युरिटीज व्यवहार कर आणि 698 कोटी रुपयांचा समानीकरण कर समाविष्ट आहे. 2025 या आर्थिक वर्षात सरकारला प्रत्यक्ष करातून 21.99 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत येण्याची अपेक्षा आहे.
अप्रत्यक्ष करातून 16.31 लाख कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. एकूण संकलनात सर्वाधिक 1.19 लाख कोटी रुपयांचा वाटा मुंबईचा आहे. यानंतर कर्नाटक आणि गोव्याने 52,076 कोटी रुपये आणि दिल्लीने 48,876 कोटी रुपयांचे योगदान दिले.