Solapur : सोलापुरमध्ये महापालिका दवाखान्यांतील प्रसुतींमध्ये वाढ !
सोलापूर महापालिकेच्या प्रसूतीगृहांची सेवा उत्कृष्ट
सोलापूर : महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये अद्ययावत सोयी सुविधा मिळत आहेत. त्यामुळे गत तीन महिन्यात सोलापूर महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये प्रसुतींमध्ये वाढ झाली आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी श्रेयस नर्सिंग होम सील केल्यानंतर, मनपाच्या सर्व आशा कार्यकर्त्या आपल्या कार्यक्षेत्रातील गर्भवती महिलांना महानगरपालिकेच्या विविध प्रसूतीगृहांमध्ये दाखल करून घेत आहेत. त्यामुळे मनपाच्या प्रसूतीगृहांमधील रुग्णसंख्या व प्रसूतींची संख्या दोन्हीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे.
महानगरपालिकेचे अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह व दाराशा प्रसूतीगृह हे अद्यावत असून, या दोन्ही ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी बरोबरच सिझेरियन डिलिव्हरी देखील यशस्वीपणे होत आहेत. याशिवाय भावनाऋषी प्रसूतीगृह, जिजामाता प्रसूतीगृह, चाकोते प्रसूतीगृह, रामवाडी प्रसूतीगृह, साबळे प्रसूतीगृह यांसारख्या इतर प्रसूतीगृहांमध्ये देखील प्रसूतींची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली आहे.
शहरवासीयांनी लाभ घ्यावा : आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने
महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये स्वच्छता, आवश्यक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग, तसेच २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. प्रसूतीगृहांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा, सुरक्षितता आणि स्वच्छता यावर विशेष भर दिला जात आहे. सोलापूरकरांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी केले आहे.
अशी आहे गत चार महिन्यांची आकडेवारी
सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये जुलै २०२५ मध्ये १८२ प्रसूती झाल्या होत्या. त्यानंतर हा आकडा नंतरच्या तीन महिन्यात बाढल्याचे दिसून येते. ऑगस्टमध्ये हा आकडा २३६ वर पोहोचला. सप्टेंबरमध्ये त्यात आणखीन वाढ होऊन २५४ इतकी संख्या झाली. ऑक्टोबरमध्ये २७० प्रसूती झाली आहेत. महापालिका प्रसुतीगृहातील ही वाढती संख्या महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांवरील नागरिकांचा वाढता विश्वास दर्शविते.