जिल्ह्यात चिकुनगुनिया-डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन : सात जणांना चिकुनगुनिया तर 18 जणांना डेंग्यूची लागण
बेळगाव : जिल्ह्यात चिकुनगुनिया आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य खातेदेखील सतर्क झाले असून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सध्या जिल्ह्यात 7 जणांना चिकुनगुनिया तर 18 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन केले जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर आणि पावसाळ्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाबाधित रुग्णांच्या संख्येत दरवर्षी वाढ होते. दोन्हीही आजार डासांनी चावा घेतल्याने होतात. त्यामुळे घर आणि परिसरात स्वच्छता राखणे गरजेचे आहे. घरात साठविण्यात आलेले पाणी वारंवार खाली करणे गरजेचे आहे. अनेकवेळा सांगूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने वेगवेगळ्या गावांना भेट देऊन त्याठिकाणी दर शुक्रवारी ‘ड्राय डे’ पाळून प्रत्येक घरातील पाणी खाली केले जाते.
चिकुनगुनिया
हा एक विषाणूजन्य आजार आहे. तो इडिस इजिप्त आणि इडिस अल्बोपिक्ट्स या डासांच्या चाव्यांमुळे पसरतो. चिकुनगुनिया झाल्यास रुग्णांमध्ये सामान्यत: तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा, पुरळ ही सामान्य लक्षणे डास चावल्यानंतर दोन ते बारा दिवसांनी दिसून येतात. ताप सामान्यत: काही दिवसांत कमी होतो. परंतु काही प्रकरणांमध्ये सांधेदुखी काही महिने किंवा वर्षे टिकू शकते, अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने संबंधितांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
डेंग्यू
डेंग्यू हा आजार इडिस इजिप्त नावाच्या मादी डासांच्या चाव्यामुळे होतो. हा डास विशेषकरून दिवसा चावतो आणि विशेषत: शहरी भागांमध्ये आढळतो. डेंग्यूची लागण झाल्यास अंगावर पुरळ, डोळ्यांमध्ये तीव्र वेदना, मळमळ किंवा उलट्या, स्नायू, हाडे आणि सांधेदुखी अशी लक्षणे आढळून येतात. बऱ्याचवेळा पोट दुखणे, वारंवार उलट्या होणे, विष्ठेत रक्त येणे, नाकातून रक्त येणे किंवा हिरड्यांमधून रक्त येणे, थकवा जाणवणे, अस्वस्थता, चिडचीड आदी लक्षणेही दिसून येतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे जोखमीचे असून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेणे गरजेचे आहे, असे जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 674 संशयित रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली असता 18 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. तर 100 जणांच्या रक्ताचे नमुने ताब्यात घेऊन चाचणी केली असता 7 जणांना चिकुनगुनिया झाल्याचे निदान झाले आहे. काही बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून काही जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. काही रुग्ण खासगी तर काही रुग्ण सरकारी इस्पितळात उपचार घेत आहेत.
जुलै-ऑगस्ट महिन्यात घ्या काळजी,आपला परिसर स्वच्छ ठेवा
सध्या जिल्ह्यात 7 जणांना चिकुनगुनिया आणि 18 जणांना डेंग्यूची लागण झाली असली तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्येत वाढ होते. कारण या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला, तसेच घरात साठवून ठेवलेल्या पाण्यावर डासांच्या आळ्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अधिक दिवस पाणी साठवून न ठेवता ते लवकरात लवकर खाली करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असेही आरोग्य खात्याने कळविले आहे.
आरोग्य खात्याकडून जनजागृतीवर भर
वाढत्या चिकुनगुनिया आणि डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. दर शुक्रवारी ‘ड्राय डे’ पाळला जातो. सर्व शाळांना आरोग्य खात्याचे अधिकारी, कर्मचारी भेट देऊन जागृती करत आहेत. आशा कार्यकर्त्या घरोघरी भेट देऊन जागृती करण्यासह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
- डॉ. विवेक होन्नळी, जिल्हा मलेरिया अधिकारी
तालुके चिकुनगुनिया रुग्ण डेंग्यू रुग्ण
बेळगाव 0 2
खानापूर 0 3
बेळगाव शहर 1 2
अथणी 0 3
चिकोडी 1 0
गोकाक 0 1
हुक्केरी 0 3
रायबाग 0 1
रामदुर्ग 3 2
सौंदत्ती 2 1
एकूण 7 18