कौंदल-हारुरी रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांची गैरसोय
नंदगड : कौंदलपासून होनकल ते हारूरी रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वाहनधारकांतून आणि या भागातील जनतेतून केली जात आहे. खानापूर-यल्लापूर राज्यमार्गापासून खानापूर-अनमोड रस्त्याला जोडण्यासाठी गेल्या काही वर्षापासून कौंदलपासून हारूरीपर्यंत रस्ता काढण्यात आला आहे. पूर्वी हा रस्ता खडीकरणाचा होता. 2015 साली या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास पाच, सहा वर्षे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती.
नंदगड, बिडी, कित्तूरहून अनमोड, गोव्याकडे जाणारी वाहने या रस्त्यापूर्वी कौंदलपासून करंबळ,रुमेवाडीमार्गे हारूरी वनखात्याच्या नाक्यापर्यंत येण्यासाठी जवळपास 9 कि. मी. अंतर कापावे लागत होते. कौंदल-हारूरी रस्ता झाल्याने हे अंतर जवळपास चार किलोमीटरने कमी झाले आहे. त्यामुळे नव्या रस्त्याला वाहनधारकांनी प्राधान्य दिले होते. त्यातच नंदगडहून येणारी वाहने गुंजी, लोंढा, रामनगर या भागात जाण्यासाठी कौंदलहून होनकलपर्यंत याच रस्त्याचा उपयोग करतात. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटर अंतर वाचते. त्यामुळे हा रस्ता सर्वच वाहनधारकांसाठी सोयीचा ठरला होता. गेल्या दोन महिन्यापासून होनकल ते हारुरीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवण्यासाठी चालक दुर्लक्ष करीत आहेत.