मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांची गैरसोय
बेळगाव : मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला असतानाच आता मोकाट जनावरांनी रस्ते अडवून लोकांची गैरसोय केली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये महानगरपालिका अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे मोकाट कुत्री कधी माणसांवर तर कधी जनावरांवर हल्ला करून त्यांना जखमी करीत आहेत. दुसरीकडे शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे रस्ता अडवून गैरसोय करत आहेत. संभाजी चौक ते यंदे खूट या मार्गावर तर जणू या जनावरांनी मालकी हक्कच गाजविण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा पहावे तेव्हा ही मोकाट जनावरे बसथांबा अडवून बसलेली दिसतात किंवा रस्त्यावर ठाण मांडून बसलेली दिसतात.
वेळी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे आडोसा शोधणाऱ्या प्रवाशांना या जनावरांमुळे बसथांब्यांमध्ये थांबणे अशक्य झाले आहे. त्यामुळे जनावरे थांब्यात व प्रवासी रस्त्यात असे चित्र पहायला मिळते. तर पाऊस नसताना ही जनावरे रस्ता अडवून ये-जा करण्यास अडचण निर्माण करत आहेत. वनिता विद्यालयाजवळील दुभाजकांपाशी दोन्ही बाजूंनी रस्त्यावर ठाण मांडलेल्या या जनावरांमुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. बसचालकाला तर मोकाट जनावरांनी निर्माण केलेल्या कोंडीमधूनच वाट काढावी लागली. मोकाट जनावरांना गोशाळेत पाठवावे व मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.