शेतकरी, नागरिकांची गैरसोय टाळावी
मंत्री एम. बी. पाटील : अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना
वार्ताहर /विजापूर
पावसाळ्यात खरीप पेरणीचे 71,370 हेक्टरचे उद्दिष्ट असताना 19,567 हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर पेरणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आढावा बैठकीत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देताना शेतकरी व नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना मंत्री, जिह्याचे प्रभारी डॉ. एम. बी. पाटील यांनी केली. विजापूर शहरातील जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित विविध विभागांच्या जिल्हास्तरीय त्रैमासिक प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या कालावधीत शेतकऱ्यांना खते व बियाणे वाटप करताना कोणताही गोंधळ होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. वितरणादरम्यान गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या व तयारीनिशी वाटपासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात ट्रान्स्फॉर्मर जळून गेल्यानंतर, ताबडतोब पुन्हा त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कोणताही विलंब न लावता वेळेवर ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना विजापूर नगर येथील शाळा क्रमांक चारला भेट देऊन इमारतीसह शाळेच्या दुरवस्थेची, खोल्या व फर्निचरची व्यवस्था याची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्याही सूचना मंत्र्यांनी दिल्या. पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा दाब काही प्रमाणात कमी होणार असून, हे पाणी घरगुती कामासाठी वापरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांमुळे पाण्याची पातळी वाढली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. तलाव भरण्याचा प्रकल्पही प्रभावी असून, खड्ड्यांतून बंधारा बांधणे आणि शेतकऱ्यांचे भूजल वाढवण्यासाठी खड्ड्यांचे सर्वेक्षण करणे, अतिक्रमण झालेले तलाव मोकळे करणे, खड्ड्यांची माहिती गोळा करणे, सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. जिह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमुळे भूगर्भातील पाणी वाढल्याने अशा भीषण दुष्काळी परिस्थितीतही जिह्यात अत्यल्प टँकर वापरून पिण्याचे पाणी दिले जाते. यावेळी मंत्री महोदयांनी या महिन्यात शासकीय सेवेतून निवृत्त होत असलेले जिल्हा प्रभारी सचिव डॉ.व्हिन्सेंट डी सोझ यांचा सत्कार केला. या बैठकीला देवरहिप्परगीचे आमदार राजूगौडा पाटील, विधान परिषद सदस्य प्रकाश राठोड, जिल्हा पंचायत केडीपी नामनिर्देशित सदस्य कोगटस्ती व नूरा अहमद अत्तार, जिल्हाधिकारी टी. भुबलन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद, जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे आदी उपस्थित होते.