किल्ला तलाव येथे साचलेल्या पाण्यामुळे मुलांची गैरसोय
पाण्यामध्येच खेळावे लागताहेत खेळ
बेळगाव : किल्ला तलाव येथे लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक उपकरणे बसविण्यात आली आहेत. परंतु त्या उपकरणांच्या खाली पावसाचे पाणी साचल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. साचलेल्या पाण्यामध्येच मुलांना खेळावे लागत आहे. त्यामुळे पाय घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किल्ला तलाव परिसरात मागील काही वर्षांपासून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. किल्ला तलावाच्या सभोवताली दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत याठिकाणी बसण्यासाठी बाकडे तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. साप्ताहिक सुटीच्या दिवशी तसेच सायंकाळी याठिकाणी लहान मुलांची संख्या अधिक असते. मागील आठवडाभरापासून झालेल्या जोरदार पावसामुळे किल्ला तलावाच्या परिसरात पाणी साचले आहे. यामुळे लहान मुलांसाठी असलेली उपकरणेही पाण्यामध्येच आहेत. मुलांच्या हट्टापायी पाण्यामध्येच उभे राहून खेळावे लागत आहे. यापुढील काळात तरी पाणी साचणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. तिकीट घेऊनही पाण्यामध्ये विविध खेळ खेळावे लागत असल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.