For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काणकोण आरोग्य केंद्रात बालरोगतज्ञ न आल्याने गैरसोय

03:13 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
काणकोण आरोग्य केंद्रात बालरोगतज्ञ न आल्याने गैरसोय
Advertisement

प्रतीक्षा करून थकलेल्या संतप्त पालकांनी विचारला आरोग्याधिकाऱ्यांना जाब, बऱ्याचवेळा पूर्वसूचना न देता डॉक्टर गैरहजर

Advertisement

काणकोण : बदलत्या वातावरणामुळे सध्या काणकोण तालुक्यातील लहान मुलांमध्ये थंडी, ताप,खोकल्याचे आजार बळावत असून काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात बालरोगतज्ञ उपलब्ध न झाल्यामुळे या ठिकाणच्या मुलांची अक्षम्य अशी गैरसोय होण्याचा प्रकार नुकताच घडला. बालरोगतज्ञाची वाट पाहून संतापलेल्या पालकांनी अखेर आरोग्याधिकारी डॉ. जुझे तावारीस यांची भेट घेतली आणि त्यांना जाब विचारला.आठवड्यातून दोन दिवस येणाऱ्या बालरोगतज्ञाकडे तपासणी करण्यासाठी आलेल्या जवळजवळ 50 पेक्षा अधिक मुलांची आणि पालकांची त्यामुळे गैरसोय झाली. त्यातील काही महिला पालक सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांत काम करीत असल्याने आपल्या मुलांच्या तपासणीसाठी त्यांनी खास रजा घेतली होती.

बालरोगतज्ञ आरोग्य केंद्रात येणार म्हणून सकाळीच येऊन कार्डे तयार करण्यात आली होती मात्र सकाळी 11 पर्यंत बालरोगतज्ञ उपलब्ध न झाल्यामुळे आरोग्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता डॉक्टर येणार नसल्याची माहिती डॉ. तावारीस यांनी दिली, अशी कैफियत एका पालकाने मांडली.बालरोगतज्ञाकडे मुलांची तपासणी करण्यासाठी गावडोंगरी, खोतीगाव, माशे, पैंगीण, खोल, आगोंद या भागांतून 50 पेक्षा अधिक पालक पाल्यांना घेऊन आले होते. काणकोण तालुक्यात खासगी बालरोगतज्ञ नसल्यामुळे सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरावरच अवलंबून राहावे लागते मात्र कसलीच पूर्वसूचना न देता डॉक्टर गैरहजर राहतात आणि हा प्रकार बऱ्याचवेळा घडतो, अशी कैफियत यावेळी उपस्थित असलेले जनसेनेचे जनार्दन भंडारी आणि अन्य पालकांनी मांडली. सरकार आता लोकांच्या आरोग्याशीही खेळायला लागले आहे. एखादवेळी काही अडचणीमुळे डॉक्टर येणार नसेल तर त्याची पूर्वसूचना देणे गरजेचे आहे मात्र काणकोणात केवळ सामाजिक आरोग्य केंद्रातच नव्हे तर सर्वच प्रशासकीय यंत्रणेत सावळा गोंधळ माजला आहे. कोणत्याही कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारीही वेळेवर येत नाहीत. कोणाचेही कशावरच नियंत्रण नाही. अशा गोष्टींवर आवाज उठविल्यास विरोधकांची गळचेपी केली जाते, असा आरोप भंडारी यांनी केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.