बेळगावात उद्योजकांवर प्राप्तिकर छापे
पहाटे 18 ठिकाणी कारवाई : उद्योजकांचे निवासस्थान-कार्यालयामध्ये शोध, महत्त्वाची कागदपत्रे जप्त
बेळगाव : बेळगावातील अनेक नामवंत उद्योजकांच्या निवासस्थान, कार्यालय अशा एकूण जिल्ह्यातील विविध 18 ठिकाणी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे एकाचवेळी छापे टाकून सर्च ऑपरेशन राबविले. शहरासह जिल्ह्यात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक उद्योजकांचे धाबे दणाणले असून यासाठी स्थानिक पोलिसांची बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हे सर्च ऑपरेशन सुरुच होते. यावेळी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. उपलब्ध माहितीनुसार बेळगावातील प्रसिद्ध उद्योजक विनोद दो•ण्णावर आणि त्यांचे बंधू पुरुषोत्तम दो•ण्णावर यांच्या टिळकवाडी येथील निवासस्थानासह कार्यालय आणि त्यांच्या संबंधित असलेल्या विविध ठिकाणी पहाटेच्या दरम्यान प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी छापेमारी केली. तसेच बेळगावातील तिसरे उद्योजक अजित पटेल यांच्या क्लब रोडवरील मालमत्तेवरही प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात 18 ठिकाणी छापे
जिल्ह्यात तब्बल 18 ठिकाणी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. कारवाईत बेळगावसह गोवा आणि बेंगळूर येथील प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दो•ण्णावर बंधू हे बेळगावातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. साखर कारखाना, आयर्न आणि ग्रेनाईटचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून आयर्न आणि ग्रेनाईटची देश- विदेशात निर्यात केली जाते. मंगळवारी पहाटे त्यांच्या टिळकवाडी येथील निवासस्थानावर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापा टाकून सर्च ऑपरेशन राबविले. त्याचबरोबर उद्योजक अजित पटेल यांच्या निवासस्थानावरही एकाचवेळी छापा टाकण्यात आला.
मॉर्निंग वॉकर्सच्या निदर्शनास आला प्रकार
सकाळच्यावेळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावरही प्राप्तीकर खात्याचे छापे पडल्याची बातमी व्हायरल होताच प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी विविध ठिकाणी धाव घेऊन वार्तांकन केले. कॅम्प पोलीस ठाण्यातील हद्दीतील क्लब रोडवरील एका ठिकाणी टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, भाग्यनगर नववा क्रॉस, हिंदवाडी या दोन ठिकाणी तर उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिसरे रेल्वे गेटनजीकच्या पंजुर्ली हॉटेलजवळ एका ठिकाणी अशा एकूण 18 ठिकाणी प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.
जिल्ह्यातील आजपर्यंतची पहिलीच मोठी कारवाई
सुरुवातीला चार ते पाच ठिकाणी छापे पडल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात 18 ठिकाणी छापेमारी झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील 16 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर पोलीस मुख्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या कागवाड आणि खानापूर येथे दोन ठिकाणी अशा एकूण जिल्ह्यात 18 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. छापेमारी करताना स्थानिक पोलिसांची बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली. पहाटेच्या दरम्यान सुरु करण्यात आलेले सर्च ऑपरेशन सायंकाळी उशिरापर्यंत सुरुच होते. यावेळी विविध ठिकाणाहून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. एकाचवेळी तब्बल 18 ठिकाणी प्राप्तीकर खात्याने छापेमारी केलेली बेळगावातील आजपर्यंतच ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे जिल्ह्याता
विनानंबर प्लेटच्या वाहनांचा वापर
जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत बेळगावसह गोवा, आणि बेंगळूर येथील प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहनांना नंबर प्लेट नसल्याचे यावेळी दिसून आले. छापे टाकण्यात आल्यानंतर काही वेळाने स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.
अशोक आयर्नवर धाड नाही
मंगळवारी सकाळी प्राप्तिकर खात्याने घातलेल्या धाडीमध्ये अशोक आयर्न ग्रुपचे नाव घेण्यात येत आहे. परंतु अशोक आयर्नवर अशी कुठलीही धाड पडली नाही. या धाडीशी आपला काहीही संबंध नाही, असे अशोक आयर्नचे अशोक हुंबरवाडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शहरात 16 ठिकाणी पोलीस बंदोबस्त
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या शहरातील 16 ठिकाणी प्राप्तिकर खात्याच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून या कारवाईबाबत आपणाला अधिक माहिती नाही.
- यडा मर्टीन मार्बंन्यांग,पोलीस आयुक्त
जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलीस बंदोबस्त
पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतील दोन ठिकाणी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्यासाठी त्यांच्या मागणीनुसार खानापूर आणि कागवाड येथे पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अन्य कोठेही कारवाई झालेली नाही.
- डॉ. भीमाशंकर गुळेद,जिल्हा पोलीस प्रमुख