बेंगळूरमध्ये 10 हून अधिक ठिकाणी प्राप्तिकर छापे
बेंगळूर : मागील दोन दिवसांत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेंगळूरमध्ये 10 हून अधिक ठिकाणी छापे टाकून 16.10 कोटींचा ऐवज जप्त केला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बेंगळूर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले असून अनेकांजवळील रोख रक्कम, बँकांमध्ये ठेवलेले सोने ताब्यात घेतले. बेंगळूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार डी. के. सुरेश यांचे निकटवर्तीय तसेच कोणनकुंटे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष श्रीधर, माजी नगरसेवक गंगाधर यांच्या निवासस्थानांवरही प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांनी श्रीधर आणि गंगाधर यांच्या निवासस्थानी कागदपत्रे ताब्यात घेऊन पडताळणी केली. या कारवाईची माहिती मिळताच दोन्ही नेत्यांच्या घरांबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. डी. के. सुरेश यांना टार्गेट करून हा छापा टाकण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.