कंग्राळी बुद्रुक येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
श्री लक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते चालना : काडा अध्यक्ष युवराज कदम, मृणाल हेब्बाळकर यांची उपस्थिती
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा जवळजवळ 43 वर्षांनी 28 एप्रिल 2026 पासून 6 मे पर्यंत मोठ्या भक्तीमय वातावरणात होणार आहे. श्री लक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीणच्या आमदार, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून 10 कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचा शुभारंभ सोमवारी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. यामुळे गावातील नागरिकांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
श्री लक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुकपर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने काँक्रीट गटारी व रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 4 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले. सदर रस्त्याच्या खोदाई कामांचा शुभारंभ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. पूर्वी एकेरी रस्ता व खाचखळगे पडलेला रस्ता श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर रूंद होऊन गुळगुळीत होणार असल्यामुळे नागरिकांना आता सुखरूप प्रवास करता येणार असल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.
यावेळी श्री लक्ष्मी मंदिर ते चव्हाटापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, श्री लक्ष्मीदेवी गदगेच्या ठिकाणी पेव्हर्स बसविणे, संताजी गल्लीतील गटारी व रस्त्यांचे डांबरीकरण, मरगाईनगरमधील रस्ते व गटारी तसेच मराठी शाळेतील तीन शाळा खोल्या बांधणे आदी कामांचाही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला. यानंतर श्री लक्ष्मी मंदिर प्रांगणात आयोजिलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री लक्ष्मी देवी यात्रा कमिटी अध्यक्ष जयराम पाटील होते. व्यासपीठावर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, काडा अध्यक्ष युवराज कदम, हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर, ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, उपाध्यक्षा दिया पम्मार, देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष मारूती पाटील उपस्थित होते.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार
प्रारंभी श्री लक्ष्मी देवीची आरती म्हणून पूजन करण्यात आल्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार श्री लक्ष्मी देवी यात्रा कमिटी, देवस्थान पंच कमिटी, अंगणवाडी, शिक्षिका, वैभवनगर, ग्रामस्थ, वारकरी भजनी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी युवराज कदम, मृणाल हेब्बाळकर, ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, उपाध्यक्षा दीपा पम्मार, जयराम पाटील, मारूती पाटील यांचाही सत्कार यात्रा कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
यात्रेसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणार
यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, कंग्राळी बुद्रुक गावची यात्रा बेळगाव जिल्ह्यामध्ये एक भव्य दिव्य होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी 24 तास अॅम्ब्युलन्स सेवा, अरण्य खात्याचे सहकार्य, अग्निशमन दल, 24 तास पोलीस पहारा तसेच गावातील नागरिकांना लक्ष्मीताई फौऊंडेशनच्यावतीने 10 ते 15 टॅक्टर व टँकरमधून पिण्याच्या पाण्याची यात्रा संपेपर्यंत सोय, राज्य परिवहन मंडळाकडून यात्रा संपेपर्यंत दररोज 10 ते 15 बसेस 24 तास सुरू तसेच हेस्कॉम खात्यासह इतर सर्व समस्या उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. युवराज कदम म्हणाले, शेतकरी बलवान तर देश बलवान हे सूत्र हकिकतमध्ये आणण्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शेतकरी वर्गाची जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बसुर्ते, हंगरगा व संतीबस्तवाड अशी तीन धरणांची निर्मिती करणार असल्याचे सांगितले.
मृणाल हेब्बाळकर म्हणाले, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुकपर्यंतच्या मुख्य रस्त्यासाठी साडेचार कोटी तर इतर विकासकामांसाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. कंग्राळी बुद्रुक गावासाठी या दोन वर्षात एकूण 22 कोटी रुपयांची विकासकामे केली असल्याचे त्यांनी सांगितले. विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्षासह सदस्य, सदस्या, यात्रा कमिटी सदस्य, देवस्थान पंचकमिटी, सदस्य, माजी सैनिक संघटना, विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, विविध कंत्राटदार, वारकरी भजनी मंडळ, विविध युवक मंडळे, महिला मंडळे, अंगणवाडी, शिक्षिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन यात्रा कमिटी सेक्रेटरी शंकर कोणेरी यांनी केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले.