For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लोकमान्य’च्या व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयाचे उद्घाटन

12:29 PM Jul 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘लोकमान्य’च्या व्ही  वाय  चव्हाण तांत्रिक महाविद्यालयाचे उद्घाटन
Advertisement

तांत्रिक शिक्षण तळागाळातील अतिशय दुर्गंम अन् प्रत्येक गावागावात पोहोचणे गरजेचे : तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती 

Advertisement

खानापूर : तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रिक शिक्षण अंत्यत महत्त्वाचे आहे. हे तांत्रिक शिक्षण तळागाळातील अतिशय दुर्गंम आणि प्रत्येक गावागावात पोहचले पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. डॉ. किरण ठाकुर यांनी खानापुरात तांत्रिक महाविद्यालयाची सुरुवात करून शैक्षणिक जगतात मोठे पाऊल टाकले आहे. तसेच तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण सुलभ होणार आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे. असे वक्तव्य खानापूर येथे लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. किरण ठाकुर होते.

दामोदर वागळे, अजित गरगट्टी, प्रकाश चव्हाण, सुबोध गावडे, किरण गावडे, बी. एन. मजुकर, महेश इनामदार, सुनिल चौगुले, जी. आर. उडपी, गजानन धामणेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, आमदार विठ्ठल हलगेकर, नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर, किरण ठाकुर, पंढरी परब, माजी आमदार दिगंबर पाटील यासह इतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. वागळे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन, स्वागतगीत गायिले. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी प्रास्ताविक भाषण करून महाविद्यालय स्थापनेमागील हेतू स्पष्ट करत खानापुरात तांत्रिक महाविद्यालयाची आवश्यकता ओळखून डॉ. किरण ठाकुर यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणाची सोय झाली आहे. असे सांगून उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते माजी मंत्री आमदार आर. व्ही. देशपांडे यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. तसेच व्यासपीठावरील उपस्थितांचाही गौरव केला.

Advertisement

तांत्रिक शिक्षणाची सोय केल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत निश्चित वाढ होणार

आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, तालुक्यात तांत्रिक शिक्षणाच्या महाविद्यालयाची गरज होती. डॉ. किरण ठाकुर यांनी महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणाची सोय केल्यामुळे विद्यार्थ्यांना आता सोयीचे होणार आहे. त्यामुळे तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निश्चित वाढ होणार आहे. भविष्यात तांत्रिक शिक्षणावर आधारीत उद्योग व्यवसाय उभारले जातील, त्यामुळे त्याचा भविष्यात तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीत हातभार लागणार आहे. माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील तसेच व्हीटीयूचे उपकुलगुरु विद्यासागर आणि वाय. एन. दोडमणी यांचीही यावेळी भाषणे झाली.

तालुक्याला बाबुराव ठाकुर यांचे क्रांतीकारी योगदान

किरण ठाकुर बोलताना म्हणाले, तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात माझे वडील बाबुराव ठाकुर यांचे क्रांतीकारी योगदान आहे. 1937 साली खानापूर, बैलहोंगल, बेळगाव आणि चिकोडी तालुक्यात शेकडो शाळा सुरू करून शिक्षणाची गंगा गावागावात पोहचविण्याचे काम केले. या शाळा 1966 साली निस्वार्थीपणे सरकारच्या स्वाधीन केल्या. त्यानंतर टीचर्स टेनिंग सुरू करून गुणवान शिक्षक निर्माण केले. त्यामुळे खानापूर तालुक्यातून शेकडो शिक्षक निर्माण झाले. वडिलांचा शैक्षणिक वारसा पुढे जपत, खानापूर तालुक्यात पांडुरंग वागळे महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर जांबोटीसारख्या पश्चिम भागात महाविद्यालय सुरू पेले आहे. तालुक्यात तांत्रिक महाविद्यालयाची कमतरता सातत्याने जाणवत होती. यासाठी खानापूर येथे सोयीनियुक्त आणि अद्ययावत असे, तांत्रिक महाविद्यालय सुरू केले आहे. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या नावाने हे महाविद्यालय सुरू करण्यामागे व्ही. वाय. चव्हाण यांचे सामाजिक आणि सीमाचळवळीतील योगदान हे कदापी विसरता येणार नाही. म्हणूनच त्यांच्या नावे हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात प्रशस्त जागेत मोठी इमारत बांधून हे तांत्रिक महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयाला डॉ. किरण ठाकुर यांच्याकडून 5 लाख रुपयाची देणगी जाहीर केली आहे.

रामनगर, नंदगड येथेही महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळे औद्योगिक प्रशिक्षण शिक्षणासाठी वेगळे दालन सुरू करण्याचा मानसही यावेळी त्यांनी बोलून दाखविला. खानापुरात तांत्रिक महाविद्यालय सुरू केल्याबद्दल किरण ठाकुर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना विजय चव्हाण कुटुंबीय, म. ए. समिती खानापूर, भाग्यलक्ष्मी सोसायटी, नगरपंचायत खानापूर, व्यायाम मंदिर खानापूर, खानापूर को. ऑप. बँक, जांबोटी को-ऑप. सोसायटी, स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्था, वनदेवी को-ऑप. सोसायटी, विशाल गिरी कुटुंबीय, पीएलडी बँक, हब्बनहट्टी देवस्थान कमिटी, शिक्षक संघटना, डॉ. वागळे कुटुंबीय, विठ्ठल महाराज, पिसेदेव सोसायटी, महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी, अॅड. आय. आर. घाडी फाऊंडेशन या संस्थांनी डॉ. किरण ठाकुर यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन प्रा. शंकर गावडा, संजय वाटुपकर, प्रा. अश्विनी घाडी यांनी केले. सत्यवत नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तग धरुन रहायचे झाल्यास तांत्रिक शिक्षण महत्त्वाचे

प्राध्यापक सी. एम. त्यागराज बोलताना म्हणाले, आज तंत्रज्ञानाचे युग सुरू आहे. असे म्हटले जाते. मात्र महाभारतातही तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम कृष्णाने केला होता. कृष्ण हा कुशल तंत्रज्ञानी होता. त्यामुळेच कौरव-पांडवांच्या युद्धात त्याचे तंत्रज्ञान दिसून आले आहे. आज तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग खेडे बनले आहे. तंत्रज्ञानाचा विस्फोट होत आहे. आणि यात तग धरुन रहायचे झाल्यास तांत्रिक शिक्षण महत्त्वाचे आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांचे भाग्य म्हणावे लागेल की, डॉ. किरण ठाकुर यांनी खानापूरसारख्या ठिकाणी तांत्रिक महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.