तिरुपती देवस्थान पाकगृहाचे उद्घाटन
तिरुपती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते तिरुपती देवस्थानच्या नूतन केंद्रीभूत पाकगृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी धार्मिक अनुष्ठानांच्या माध्यमातून करण्यात आला. शुक्रवारी रात्रीपासून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नायडू देवस्थानच्या परिसरातच वास्तव्याला होते. त्यांनी शनिवारी सकाळी भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर ‘पट्टू वस्त्रलू’ अर्थात रेशमी वस्त्राचे वेष्टण केले. या कार्यकमाला देवस्थानचे सर्व पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. देवस्थानाच्या नव्या पाकगृहात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रसाद आणि अन्य अन्नपदार्थांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच अन्नपदार्थ आणि भक्तांना वितरीत करण्यात येणारा प्रसाद यांची शुद्धता परिपूर्णप्रकारे सुनिश्चित केली जाण्याची व्यवस्था केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.