राज्यस्तरीय वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन
21 डिसेंबरपर्यंत खुले ; 100 स्टॉलचा समावेश
बेळगाव : राष्ट्रीय जीवनोपाय अभियान कर्नाटकच्या नेतृत्वात व कौशल्यविकास, उद्योजकता, जीवनोपाय खाते, जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत व महापालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार्स हायस्कूल मैदानावर राज्यस्तरीय वस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात 100 स्टॉल मांडले असून, यामध्ये राज्यातील महिला स्व-साहाय्य गटांनी तयार केलेल्या वस्तू मांडल्या आहेत. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉलही आहेत. मनोरंजनासाठी नृत्य, संगीत, गायन यांचीही व्यवस्था आहे. प्रदर्शन 21 डिसेंबरपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 9. 30 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.