सीपीआर हॉस्पिटलमधील निवारा केंद्राचे उद्घाटन! रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार निवारा
कोल्हापूर प्रतिनिधी
येथील सीपीआर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा वास्तूचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. हॉस्पिटलमधील रुग्ण युवराज पाटील याच्या हस्ते हा आगळावेगळा कार्यक्रम झाला. रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना थांबण्यासाठी, रात्री झोपण्यासाठी हॉस्पिटलच्या आवारात पुरेशी सोय नव्हती, याची दखल घेऊन प्रख्यात आर्किटेक्ट बेरी यांनी त्यांच्या एचईडीएफ फंडातून याची उभारणी केली आहे.
या निवाऱ्यात किमान शंभर जणांना बसण्याची व किमान 50 जणांच्या झोपण्याची सोय होणार आहे. यापूर्वी रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या आवारातील पाण्याच्या टाकीवरच विश्रांती घेत होते. याच टाकीवर निवारा शेड उभारली आहे.
सकाळी झालेल्या एका छोट्याशा समारंभात युवराज पाटील या रुग्णाच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शिरीष बेरी, राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. रणजीत जाधव, डॉ. जईर पटवेकर, शशिकांत रावळ, महेंद्रसिंह चव्हाण, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, आर्किटेक्ट आशर फिलीप, बेरी यांचा स्नेह परिवार उपस्थित होता. या निवाऱ्यात रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची मोफत सोय केली आहे. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून हा निवारा उभा करून दिल्याचे बेरी यांनी या समारंभात सांगितले.