हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कायदा सेवा प्राधिकार केंद्राचा शुभारंभ
कैद्यांना कायदेशीर सल्ला मिळणार
बेळगाव : हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात जिल्हा कायदा सेवा प्राधिकार केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश त्यागराज एन. इनवळ्ळी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हिंडलगा मध्यवर्ती कारागृह व जिल्हा कायदा सेवा प्राधिकारणाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, जिल्हा सर्जन डॉ. विठ्ठल शिंदे, कारागृहाचे प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती, प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर आदी उपस्थित होते. जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणातर्फे कारागृहातील कैद्यांना मोफत कायदा सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. खासकरून गरीब कैद्यांसाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे. कायदा सेवा प्राधिकरणाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांकडून कैद्यांना कायदेशीर सल्ला मिळणार आहे. यापूर्वीही प्राधिकरणाच्या मदतीने अनेकांची सुटका झाली आहे.