For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिकोडीत केएलई सीबीएससी स्कूलचे उद्या उद्घाटन

10:42 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिकोडीत केएलई सीबीएससी स्कूलचे उद्या उद्घाटन
Advertisement

डॉ. प्रभाकर कोरे यांची माहिती : केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर राहणार उपस्थित

Advertisement

बेळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी केएलईच्यावतीने चिकोडी येथे सीबीएससी शाळा सुरू करण्यात आली आहे. बुधवार दि. 28 रोजी सकाळी 10.30 वाजता शाळेचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र मंत्री पद्मश्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची विशेष उपस्थिती असेल, अशी माहिती केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 1916 मध्ये स्थापन झालेल्या केएलईने आजवरच्या 108 वर्षांच्या इतिहासात शिक्षण, आरोग्य व संशोधन या क्षेत्रात जागतिक मान्यता मिळविली आहे. सध्या संस्थेमध्ये 1 लाख 38 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून 18 हजार कर्मचारी सेवा बजावत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण केएलईमध्ये दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन अंकली, निपाणी, हावेरी, सौंदत्ती, अथणी, गोकाक, गळतगा, केरुर या सारख्या ग्रामीण भागात कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. केएलईच्या एकूण 15 सीबीएससी शाळा असून महाराष्ट्रासह कर्नाटकामध्येही या चालविल्या जात आहेत. यामध्ये 21 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मातृभाषेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी इंग्रजीची आवश्यकता असल्याने चिकोडी येथे सीबीएससी शाळा सुरू केली आहे. उद्घाटनप्रसंगी कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, चिकोडी-सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, प्रवीण कांबळे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केएलईचे अध्यक्ष महांतेश कौजलगी असणार आहेत.

अमित कोरेही लोकसभेसाठी प्रमुख दावेदार

Advertisement

चिकोडी लोकसभेसाठी अमित कोरे यांचे नाव चर्चेत असल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे यांना पत्रकारांनी छेडले असता, अनेक जण बेळगाव व चिकोडी मतदारसंघातून प्रयत्नशील आहेत. प्रत्येक जण आपण केलेल्या कार्याची माहिती पक्षापर्यंत पोहोचवत आहे. अमित कोरे हे मागील अनेक वर्षांपासून साखर कारखान्यांच्या माध्यमातून चिकोडी मतदारसंघात पोहोचले असल्याने त्यांच्या समर्थकांकडून लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अमित कोरेही लोकसभेसाठीचे प्रमुख दावेदार असल्याचे कोरे यांनी अधोरेखित केले आहे.

Advertisement
Tags :

.